कोयनानगर – कोयना धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. धरणाची सुरक्षा व स्थानिक विकासाला प्राधान्य असून, धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात बोटिंगला परवानगी देण्यात आली आहे. धरणाच्या भिंतीपासून तीन किमी पुढे मानाईनगर येथे बोटिंग स्पॉट होणार आहे. धरणाची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी सर्व पर्यायांचा वापर करण्यात येणार आहे. बोटिंग स्पॉटवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस हाऊसबोट, रडार अशी आधुनिक यंत्रणा वापरण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी झालेल्या धरण सुरक्षा आढावा बैठकीत ते बोलत होते. कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, कराडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार रमेश पाटील, उपअभियंता आशिष जाधव, सपोनि नवनाथ गायकवाड, एसआयटी, वन व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धरणाच्या सुरक्षेबाबत गृह विभागाचा अहवाल आल्यानंतर, नोटिफिकेशन निघेल. त्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळण्यासह सर्व गोष्टी असतील. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टीचा अंतर्भाव असावा, असा प्रस्ताव दिला आहे, असे शेख यांनी सांगितले. शिवसागर जलाशयात धरणाच्या भिंतीपासून तीन किलोमीटरवर मानाईनगर येथे बोटिंग स्पॉट होणार आहे.
धरणाची सुरक्षा अधिक भक्कम होण्यासाठी बोटिंग स्पॉटच्या परीसरात फ्लोटिंग रडार, जीपीएस सिस्टीम आवश्यक आहे. जून-ऑक्टोबर दरम्यान बोटिंग बंद ठेवणे, कोयनानगरात निवासासाठी येणाऱ्या पर्यटकांची आधारकार्ड नोंदणी आवश्यक करणे, जलाशया अनधिकृत बोटींना मनाई करणे, असे प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आले.