कोयनानगर – कोयना धरणाची सुरक्षा भक्कमच असून हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. धरणाची सुरक्षितता व स्थानिक विकासाला प्राधान्य असल्याने कोयना धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात बोटिंग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोयना धरणाच्या भिंतीपासून ३ किलोमीटर पुढे मानाईनगर येथे बोटिंग स्पॉट होणार असल्याने धरणाची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासाठी सर्व पर्यायाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच बोटिंग स्पॉटवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस हाऊस बोट, रडार ही आधुनिक सिस्टम वापरून सुरक्षितता अधिक अलर्ट करणार असल्याचा मनोदय पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केला.
येथील शासकीय विश्रामगृहात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत धरण सुरक्षा आढावा बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रमेश पाटील, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, कराडचे पोलीस उप अधीक्षक डॉ. रणजीत पाटील, एसआयटी, वन्यजीव व महसूल विभागाचे आधिकारी, उपअभियंता आशिष जाधव, सहायक पोलीस निरिक्षक नवनाथ गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी धरणाच्या सुरक्षिततेबाबत गृह विभाग जो अहवाल सादर करेल, तेच प्रतिबंधित क्षेत्र वगळताना जे नोटिफिकेशन निघेल त्यात या सर्व गोष्टी असतील. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव असावा यासाठी प्रस्ताव दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग स्पॉट निश्चित झाला असून धरणाच्या भिंतीपासून ३ किलोमीटर पुढे मानाईनगर येथे हा बोटिंग स्पॉट होणार आहे. येथे बोटिंग स्पॉट होणार असल्याने धरणाची सुरक्षितता अधिक भक्कम होणे गरजेचे असून या दृष्टीने या परिसरात फ्लोटिंग, रडार, जीपीएस सिस्टम आवश्यक आहे. जून ते ऑक्टोंबर दरम्यान बोटिंग बंद ठेवणे, कोयनानगर परिसरातील सर्व पर्यटक निवासस्थानांवर येणाऱ्या पर्यटकांची आधारकार्ड नोंदणी आवश्यक असून कोयनेला अनधिकृत बोटी चालणार नसल्याचा प्रस्तावही या बैठकीत मांडण्यात आला.