गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज घ्यावी महावितरणचे मंडळाना आवाहन
पिंपरी – सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेता यावी, यासाठी महावितरणकडून सवलतीच्या दरामध्ये तात्पुरती वीज जोडणी देण्यात येणार आहे. मंडळांनी अधिकृत वीज जोड घ्यावे तसेच गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सार्वजनिक उत्सवाच्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रति युनिट 3 रुपये 27 पैसे अधिक 1 रुपया 28 पैसे वहन आकार वीज दर आहे. मात्र, सार्वजनिक उत्सवासाठी घेतलेल्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आता केवळ एकच वीज दर आकारण्यात येत आहे. त्यामुळे, अधिक प्रमाणात वीज वापरली तरी शेवटच्या युनिटपर्यंत 4 रुपये 55 पैसे दराने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच गणेश मंडळाला प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आले असून एक हजार रुपये जोडणी खर्च आकारण्यात येणार आहे.
मंडळाला ज्या प्रमाणात वीज वापरायची आहे, त्या प्रमाणात सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येणार आहे. मंडळानी महामंडळाकडे ठेवलेली सुरक्षा ठेव रक्कम गणेशोतत्सव संपल्यानंतर मंडळाच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळाला महावितरणकडे वीजजोडणी घेण्यासाठी गणेश मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीसाठी प्रमाणपत्र (सेल्फ सर्टीफिकेशन), बॅंक खात्याची माहिती व मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
संभाव्य धोके टाळा
गणेशोत्सव काळामध्ये पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज यंत्रणेची काळजी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे, गणेश मंडपातील अर्थिंग सुस्थितीमध्ये असल्याची खात्री करावी, या शिवाय संबंधित महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल नंबर जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
… त्यानंतरच पोलिसांकडून मिळणार परवानगी
पिंपरी-चिंचवड महावितरणकडे काही गणेश मंडळाचे तात्पुरत्या वीज जोडणी कनेक्शनसाठी अर्ज आले आहेत. या मंडळाच्या कागदपत्राची तपासणी करुन त्यांना वीज कनेक्शन देण्यात येत आहे. महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेतलेल्या गणेश मंडळाची नावे संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात येणार आहेत. महावितरणकडून आलेली नावांची तपासणी करुनच, त्या गणेश मंडळाला परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांनी दिली.