मंडळाचे पदाधिकारी धोनीशी चर्चा करणार

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवनियुक्‍त पदाधिकारी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी त्याच्या कारकिर्दीबाबत लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती मंडळाच्या सूत्राने दिली.

सध्या कार्यरत असलेली निवड समिती आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी अखेरची संघ निवड करेल, त्यानंतर या समितीची मुदत संपणार आहे. अर्थात या मालिकेतुनही धोनीने विश्रांती घेतली असून आता मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या सदस्यांच्या निवडसमितीची नियुक्‍ती केली जाईल.

या समितीची मंडळाचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीशी चर्चा होईल आणि त्यानंतर त्यांची धोनीशी त्याच्या कारकिर्दीबाबत संवाद साधला जाणार आहे. सध्याचे निवडसमितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद आणि अन्य सदस्य यांनी यापूर्वीही धोनीशी चर्चा केली होती, मात्र, त्यावेळी धोनीने सध्यातरी काही विचार केला नसल्याचे सांगितले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट

स्पर्धेतील उपांत्य सामन्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. पुढील महिन्यात बांगलादेश विरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड येत्या 24 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. 23 ऑक्‍टोबर रोजी मंडळाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निवड समितीचे सदस्य आणि भारतीय संघाचा कर्णधार कोहली यांच्याशी गांगुली चर्चा करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.