पिंपरी, दि. 22 – पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेले आरटीईसाठीचे मदत केंद्र केवळ शोभेचे बनले आहे. विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शन करण्यापुरतेच हे केंद्र मर्यादित राहिले आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास नकारघंटा दिली जात असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. परिणामी अनेकांना खासगी महाईसेवा केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. तिथे त्यांची आर्थिक लूट होत असल्याने पालकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे.
सध्या आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. वेबसाइट हॅंग होणे आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे पालकांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. बहुतांश आरटीई पालक हे अल्प शिक्षित आणि इंटरनेटचे ज्ञान नसल्याने महाईसेवा केंद्रात अर्ज भरत आहेत. आरटीई अर्ज भरून देणाऱ्या केंद्रांचा शहरात सुळसुळाट झाला असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी पालकांकडून शंभर ते पाचशे रुपये उकळले जात आहेत. तर काहीजण सामाजिक काम करण्याच्या नावाखाली आरटीई अर्ज भरून पैसे कमवित आहेत. पालकांच्या अज्ञानपणाचा फायदा पैसे कमविण्यासाठी होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने आरटीईसाठी दहा मदत केंद्र सुरू केले आहेत. तिथे अर्ज भरले जात नसून केवळ मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे पालकांची होणारी ही लूट थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया ः
आरटीईचे अर्ज भरताना आधीच अनेक अडचणी येत आहेत. त्यामध्ये आरटीई मदत केंद्रात अर्ज भरल जात नसल्याचे सांगण्यात आले. मुलाच्या शिक्षणात अडथळा नको म्हणून महाईसेवा केंद्रात 400 रुपये देऊन अर्ज भरला.
– बाळासाहेब खुंटे, पालक.