नवी दिल्ली : बलात्कार आणि अपहरण प्रकरणात फरार असलेले नित्यानंद यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इंटरपोलने गुजरात पोलिसांच्या विनंतीनंतर त्यांच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. गेल्या वर्षभरापासून नित्यानंद फरार आहेत.
याशिवाय बलात्कार आणि अपहरण प्रकरणी नित्यानंद यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण प्रकरणात गुजरात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात म्हटले आहे की, गेल्या वर्षी कर्नाटकात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नित्यानंद फरार आहेत. अहमदाबाद आश्रमातून 2 मुली बेपत्ता झाल्यावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नित्यानंद यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. अहमदाबादचे पोलिस उपअधीक्षक टी. कमरिया म्हणाले की, इंटरपोलने बलात्कार आणि अपहरण केल्या प्रकरणी नित्यानंदविरूद्ध ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे.
का दिली जाते ब्लू कॉर्नर नोटीस?
गुन्हेगार आणि हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस बजावली जाते. तर गुन्हेगारास अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते. अलीकडेच गुजरात पोलिसांनी नित्यानंद यांना फरार घोषित केले आहे.
नुकतीच नित्यानंद यांनी जाहीर केले की, त्यांनी इक्वाडोरकडून विकत घेतलेल्या बेटावर हिंदु राष्ट्र-कैलाश स्थापन केले आहे. नित्यानंद यांचे खरे नाव राजशेखरन असून ते तामिळनाडूचे रहिवाशी आहेत.