विरार – वसईत शिवसेनेच्या 150 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे सेनेत मोठी खळबळ उडाली आहे. या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.
पक्षाच्या आढावा बैठका आणि निर्णय प्रक्रियेतून लांब ठेवले जात असून इतर पक्षातून आलेल्याना जवळ केले जात असल्याचे कारण देत वसई पूर्वेमधील गोखिवरे,सातिवली, वालिव ,गावराईपाडा ,संतोष भुवन या पाच विभागातील सेनेच्या 150 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.
सामूहिक राजीनामा दिलेल्या मध्ये बोईसर विधान सभा समन्वयक अजित भोईर, उपतालुका प्रमुख काकासाहेब मोटे , विभाग प्रमुख शरद गावकर, युवा सेनेचे धनंजय मोहिते यांच्या सह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पूर्वपट्टीत खळबळ उडाली आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्हाला पदापेक्षा ओळख आहे ती शिवसैनिक म्हणून. त्यामुळे आम्ही पदाचे राजीनामे दिले आहेत. शिवसैनिक म्हणून आम्ही कायम आहोत. सत्ता आल्यावर पक्षासाठी खस्ता खालेल्याला शिवसैनिकांना लांब केले जात आहे. तर इतर पक्षातून आलेल्याना मात्र पायघड्या घातल्या जात आहेत. अशा प्रकारे या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे दिले आहेत.