संतोष कोकरे
हुल्लडबाजीवर नजर ठेवण्याची गरज
ठोसेघर – ठोसेघर धबधब्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चाळकेवाडी, जगमीनच्या पवनचक्क्यांच्या पठारावर कास पुष्प पठाराप्रमाणेच अनेक दुर्मिळ प्रजातींच्या फुलांना बहर आला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या विस्तीर्ण पठाराकडे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे.
कास पठाराला फुलांच्या हंगामात हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. कास पुष्प पठारावर आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांच्या अनेक प्रजाती चाळकेवाडीच्या पठारावरही बहरू लागल्या आहेत. लाल गोंधणी, निळवंती, सोनकी, एक डांगी, सोन टिकली यासह इतर दुर्मिळ प्रजातीच्या रंगबेरंगी फुलांचे गालिचे या पठारावर पसरले आहेत.
याच मार्गावर असलेल्या सज्जनगड, ठोसेघर धबधबा या पर्यटन स्थळांचाही आनंद एकाच सफारीत घेता येतो. चाळकेवाडीच्या पठारावर रंगबेरंगी फुलांबरोबरच सर्वदूर पसरलेल्या पवनचक्क्या, पठाराच्या पश्चिमेस असलेल्या कोयनेचे बॅक वॉटर यांचेही दर्शन घेता येते. अनेक दुर्मिळ प्रजातींचे पशुपक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांचाही या ठिकाणी वावर आहे.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील आठ गावांमध्ये चाळकेवाडी, शेजारील जांभे, चिखली, ठोसेघर या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात या पठारावर पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात पर्यटकांचा ओढा वाढू शकतो. त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
चाळकेवाडीच्या पठारावर रंगबेरंगी फुलांचा आणि गर्द धुक्यात हरवलेल्या पवनचक्क्यांच्या आनंद घेण्यासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांना इतर पर्यटन स्थळांवर द्यावे लागणारे पार्किंग शुल्क, प्रवेश शुल्क द्यावे लागत नाही. सर्वसामान्यांना निसर्ग सौंदर्याचा निःशुल्क आनंद घेता येतो.
सध्या तरी प्रवेशासाठी शुल्क नाही
चाळकेवाडीच्या विस्तीर्ण पठारावर चोहीकडे फुले बहरली असून बहुतांश परिसर निर्जन आहे. तेथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही. याचा फायदा घेऊन एकांताच्या शोधात असलेली प्रेमी युगुले, हुल्लडबाज आणि मद्यपींचा वावर वाढण्याची शक्यता आहे. येथे हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवण्याची गरज आहे.