शिबिराचे प्रमाण निम्म्याहून अधिक घटले
सात महिन्यांमध्ये अवघ्या अडीच हजार जणांनी केले रक्तदान
‘बी’ आणि ‘एबी’ रक्तगटाच्या रक्ताची मोठी चणचण
पिंपरी – शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. विशेषत: निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविण्यात प्रचंड अडचणी जाणवत आहेत. पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त उपलब्ध होत असले तरीही प्रामुख्याने “बी’ आणि “एबी’ रक्तगटाच्या रक्त पिशव्या मिळविण्यासाठी मोठी धावाधाव करावी लागत आहे. शहरात करोनाचा प्रवेश झाल्यानंतर रक्तदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याने शहराला आता रक्ताचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.
कोविडमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण निम्म्याहून अधिक घटले आहे. त्याचाच परिणाम रक्ताचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे. महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीत गेल्या आर्थिक वर्षात 8 हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यंदा एप्रिलपासून आत्तापर्यंत गेल्या साडेसात महिन्यांमध्ये 2 हजार 500 रक्तदात्यांनीच रक्तदान केले आहे. कोविडमुळे यंदा रक्तदात्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
प्लाझ्माचीही वाढली मागणी
कोवीड झालेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या प्लाझ्माचीही मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. वायसीएम रक्तपेढीत सध्या दररोज 5 ते 6 प्लाझ्मादान केले जात आहे. प्लाझ्माची मागणी वाढल्याने आवश्यकतेनुसार प्लाझ्मादात्यांना बोलावून घेतले जात आहे, अशी माहिती वायसीएम रक्तपेढीतील रक्त संकलन अधिकारी शंकर मोसलगी यांनी दिली.
डी.वाय.पाटील रक्तपेढीत तुटवडा
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढीत तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रक्तगटाची एकही रक्तपिशवी आज उपलब्ध नव्हती. कोविडमुळे रक्तदान शिबिर झाले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे रक्तपेढीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरांची गरज
शहरात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने विविध स्वयंसेवी संस्था, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर घेण्याची गरज आहे. रक्ताला दुसरा पर्याय नसल्याने रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानानेच अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यायला हवे.
वायसीएममध्ये स्थिती गंभीर
वायसीएम रक्तपेढीत “बी’ निगेटिव्ह रक्तगटाच्या केवळ 2 रक्तपिशव्या आज उपलब्ध होत्या. पॉझिटिव्ह रक्तगटामध्ये “एबी’ पॉझिटिव्ह रक्तगटाची 1 पिशवी, “ए’ आणि “बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या प्रत्येकी 6 रक्तपिशव्या उपलब्ध होत्या. तर, “ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 7 पिशव्याच उपलब्ध असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. वायसीएममध्ये सध्या कोविडशिवाय अन्य आजारावरील रुग्णांवर देखील उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णालयात विविध आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी रक्त पिशव्यांची मागणी वाढली आहे. शस्त्रक्रियांसाठी रक्त पिशव्यांची मागणी आधीच नोंदवून ठेवावी लागते. प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी अतिरिक्त रक्ताची गरज लागेलच असे नाही. मात्र, शस्त्रक्रिया करताना अतिरिक्तरक्तस्त्राव झाल्यानंतर रक्त मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागू नये, यासाठी ही दक्षता घ्यावी लागते.
रक्ताचा दरवर्षी दिवाळीच्या सुमारास तुटवडा जाणवतो. यंदा कोविडमुळे रक्तदान शिबिरांची संख्या निम्म्याने घटली आहे. पूर्वी महिन्याला 7 ते 8 रक्तदान शिबिर होत होते. सध्या 3-4 रक्तदान शिबिरही होत नाहीत. रक्तदान शिबिर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. चिंचवडगाव-गांधी पेठ येथे 22 तारखेला एक रक्तदान शिबिर होणार आहे.
– शंकर मोसलगी, रक्तसंकलन अधिकारी, वायसीएम रक्तपेढी.