करोनाच्या उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज; संशयीत 20 जण निगराणीखाली
नगर (प्रतिनिधी) – नगरमध्ये करोनाचा एक रुग्ण आढळल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रुग्णाच्या संपर्कातील 8 व अन्य 8 अशा एकूण 16 जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून, स्वतंत्रपणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकारांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
याशिवाय, नुकतेच परदेश दौरे करुन आलेल्या आठ नागरिकांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजअखेर, जिल्ह्यातील एकूण 20 जण हे देखरेखीखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, अशा रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन केले.
नगरमध्ये दुबईहून आलेल्या चौघांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. तर उर्वरित तिघांचे नमुने निगेटिव्ह आले. शुक्रवारी या कोरोनाबाधित रुग्णाची माहिती प्रशासनाने जाहीर केली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. दुबईहून आलेल्या करोनाबाधीत रुग्णाच्या थेट संपर्कात चार जण, तर दुरच्या संपर्कात चार जण आले होते. याशिवाय इटलीहून आलेला एकजण व त्याच्या संपर्कातील तिघे आणि जिल्हा रुग्णालयात स्वत:हून तपासणीसाठी आलेले चौघे, अशा एकूण 16 जणांचे नमुने पुण्याला एनआयव्हीकडे पाठवले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, करोनाबाधीत रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण केंद्रात हलवले आहे. 16 पैकी 4 जण थेट रुग्णाच्या संपर्कात होते. त्यांचे नमुने घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात ठेवले आहे, तर उर्वरित 3 जणांना त्यांच्या घरी निगरानीखाली ठेवले आहे. करोनाबाधीत रुग्णाला सर्दी, खोकल्यासारखी कोणतीही लक्षणे नाहीत. तो ठणठणीत आहे. परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहे. आणखी सात दिवसांनी पुन्हा या रुग्णाचे थुंकीचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील. त्यात अहवाल निगेटिव्ह आला, तर रुग्णाला डिस्चार्ज दिला जाईल, असे सांगितले.