‘रन’भूमी ( #ICCWorldCup2019 ) : वेगवान गोलंदाज गाजवतायत मैदान

विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी इंग्लंड येथील मैदानांवरील खेळपट्‌टया या फलंदाजांना पोषक अशा बनवल्या गेल्या असुन या खेळपट्‌टयांवर 500 धावा करणे देखील सोपे असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात विश्‍वचषकाला सुरूवात झाल्यानंतर चित्र वेगळेच दिसायला लागले आहे.

विश्‍वचषक सुरू झाल्यापासुन 500 धावांचे लक्ष्य सोडाच साधे 350 धावांचे लक्ष्यही कोणत्या संघाने गाठले नाही. त्यातील केवळ तीन सामन्यांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा झाल्या. ज्यातील दोन सामने हे यजमान इंग्लंडच्या संघाने खेळलेले सामने होय. तर, एक सामना बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान झालेला सामना होय. यावेळी इंग्लंडने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध तडाखेबाज फलंदाजी करत 311 धावांची मजल मारली होती. त्यावर प्रत्युत्तरात आफ्रिकेला केवळ 207 धावाच करता आल्या.

इंग्लंड व्यतिरिक्त पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या संघांना 300 पेक्षा जास्त धावांची मजल मारता आली होती. यावेळी विश्‍वचषकात आतापर्यंतच्या सर्व सामन्यात वरचष्मा राहिला तो गोलंदाजांचा ते वेगवान असो की फिरकी गोलंदाज. त्यातल्या त्यात पहिल्या सामन्यापासुन वेगवान गोलंदाजांनी आपले वर्चस्व निर्माण केलेले पहायला मिळत आहे. याचा प्रत्यय पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्या दरम्यान आला होता. पाकिस्तानच्या बलाढ्य फलंदाजीला वेस्ट इंडिजच्या वेगवान तोफखान्याने केवळ 105 धावांमध्येच गारद केले होते. त्या सामन्यात विंडीजच्या संघाने आपल्या सुवर्णकाळाच्या आठवणींना उजाळा दिला. तर, अन्य सामन्यात न्युझीलंडच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता.

वेगवान गालंदाजांचा हाच धडाका भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्या दरम्यान पहावयाला मिळाला. यावेळी जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, कगिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस यांचे चेंडू वाऱ्याच्या वेगाने हवेत दिशा बदलत होते ज्यामुळे फलंदाजांना चांगलाच घाम फुटत होता. त्यामुळे सामन्यात फाफ ड्यु प्लेसिस, डेव्हिड मिलर, रोहित शर्मा सारख्या फलंदाजांना कसोटी सामन्या प्रमाणे खेळी करावी लागली होती.

तर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्या दरम्यान वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या अव्वल फलंदाजांना आल्या पावली माघारी फिरवले होते. तर, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने सामन्यात 5 गडी बाद करत आपली प्रतिभा दाखवून दिली होती. एकुणच काय तर यंदाची स्पर्धा ही वेगवान गोलंदाजच गाजवताना दिसुन येत आहेत.

-आनंद गावरस्कर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.