राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखली; पन्हाळा चार दरवाजाजवळील रस्ता खचला

कोल्हापूर – जिल्ह्यात पुराचा वेढा पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बऱ्याच भागातील रस्ते बंद असून विद्युत पुरवठा व दूरध्वनी यंत्रणा खंडित झाली आहे. 

सांगली -कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्याला बॅक वॉटरमुळे पुराचे पाणी आले असून ब्रिजवर चार फूट पाणी आले. बॅरिगेट्‌स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. शुक्रवारी सकाळी मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाजवळील रस्ता खचून वाहून गेला.

मांगुरे फाटयानजीक पाणी आले आहे. कागल-निपाणी रोड बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. पुणे ते बेंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. वेदगंगा नदीचे पाणी यमगर्णी पुलावर आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली आहे. याशिवाय कागल ते निढोरी राज्यमार्गावरील सिद्धनेर्ली नदी किनारा येथे दुधगंगा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. यामुळे हा रस्ता वाहुतकीसाठी बंद आहे.

जिल्ह्यातील 116 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदी धोक्‍याच्या पातळीवरुन वाहत आहे. शुक्रवारी (ता. 23 जुलै) सकाळी दहा वाजता राजाराम बंधारा येथे पाणी पातळी 48 फूट दहा इंच इतकी झाली.

दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना पूरग्रस्त भागात व्यक्तिशः पोहोचून मदतकार्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. पालकमंत्री पाटील हे रात्रभर अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नागरिकांचे स्थलांतर व मदतकार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.