आंबेगाव बुद्रुक -पुणे शहरातून जाणारा मुंबई महामार्ग वाढत्या वाहतूक कोंडीमुळे कात्रजवरून बायपास काढण्यात आला.तसेच पर्यायी मार्ग म्हणून कात्रज नवीन बोगदा मार्गे वाहतूक वळवण्यात आली, याच कारणाने बायपास मार्गावर वारंवार अपघात व वाहतूक कोंडी होऊन देखील दुर्लक्ष होत आहे.
कात्रज-नवले पूल रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. पूर्वी गरजेनुसार रस्ते किंवा भुयारी मार्ग तयार केले गेले. मात्र, त्यानंतर या रस्त्याचा विकास किंवा रुंदीकरण किंवा भुयारी मार्गाची निर्मिती झाली नाही, यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा करून सदर रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर करून आणला. दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये या रस्त्याचे सापदरीकरणाचे काम चालले असून सेवा रस्ते ही आता तयार झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून पाच मिनिटाच्या अंतरासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीत तासन् तास अडकून पडावे लागत आहे.
आंबेगाव भुयारी मार्गापासून डी-मार्ट पर्यंत तयार झालेल्या सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी केले जात आहेत. या भागात डी-मार्ट, शिलाई व व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु सेवा रस्त्यावर दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाहने पार्क केल्यामुळे रस्ता कितीही मोठा असला तरी वाहतूक कोंडी होत आहे.
कात्रज-नवले पूल रस्ता रूंदीकरणाचे काम गेली तीन वर्षांपासून संथगतीने चालले आहे, यामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना अनिधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेच्या वाहतूक विभागाने या भागाची पाहणी करून अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत.
कात्रज बायपासच्या कामाबाबत सुरवतीपासूनच संबंधीत प्रशासनाने आळमटळमची भूमिका घेतली आहे. याकामात त्रुटी असतानाच आत काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता पार्किंगसाठीच खुला करून ठेवला असल्याचा भास होत आहे. प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात. हेच कळत नाही. संबंधीतांनी याकडे लक्ष द्यावे.
– संतोष ताठे, माजी सरपंच, आंबेगाव बु.
बायपास रस्ता हा वाहनचालकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आला आहे. परंतु, याचा वापर वाहतुकीसाठी ऐवजी वाहने उभी करण्यासाठीच मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हा रस्ता पार्किंग झोन म्हणून घोषित करून पे ऍन्ड पर्किंग तरी सुरू करावे, यातून महसूल तरी मिळेल.
– निलेश कोंढरे, माजी उपसरपंच, आंबेगाव बु.