कोयनानगर(प्रतिनिधी) :– कराड-चिपळूण राज्य मार्गावर हेळवाक (ता. पाटण) येथे राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. रस्त्यावर पडलेल्या खड्यात बसून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. तसेच 15 नोव्हेंबरपर्यंत रस्ता व्यवस्थित न केल्यास सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, पं.स. सदस्य बबनराव कांबळे, माजी सभापती पूजा कदम, महिला अध्यक्षा सेन्हल जाधव ,मेंढेघरचे सरपंच निता इंगळे, उपसरपंच बाळासाहेब कदम, नेचलचे सरपंच राम मोहिते, रमेश जाधव, मनीष चौधरी, रामभाऊ मोरे, भरत कदम, मनोज मोहीते, दाजी पाटील, बापू चव्हाण आदी. प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कराड-चिपळूण राज्यमार्ग अनेक दिवसापासून खड्डेमय झाला असल्याने जनतेत आक्रोश आहे. हा महामार्ग व्यवस्थीत कऱण्यासाठी १६ कोटी रूपयांचा निधी शासनाने खर्च केला. तरीही रस्त्यावर डांबराऐवजी खड्डेच जास्त पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था कराड-चिपळूण राज्यमार्गाची झाली असून याविरोधात अनेकवेळा आंदोलन करूनही प्रशासन दूर्लक्ष करत आहे. त्यामुळे राष्ट्रावादी कॉंग्रेसने हेळवाक येथे रास्ता-रोको आंदोलन करुन अर्धा तास राज्यमार्ग रोखून धरला. तसेच येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत हा रस्ता व्यवस्थित केला नाही. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सविनय कायदेभंग आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तद्नंतर नायब तहसीलदार थोरात यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. आंदोलनादरम्यान पोनि एन.आर. चौखडे, सपोनि नवनाथ गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.