त्रुटी असलेले सातबारा उतारे ‘ब्लॉक’

खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविले

पुणे – सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षात जागेवर असलेल्या क्षेत्रात तफावत, कब्जेदार सदरी असलेल्या नावातील चुका, चुकीच्या पद्धतीने नोंद आदी प्रकाराच्या त्रुटी राज्यातील सुमारे 3 लाख 59 हजार सातबारा उताऱ्यावर आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात त्रुटी असलेल्या 28 हजार 900 सातबारा उतारे आहेत. या त्रुटी असलेल्या सातबारा उताऱ्यांवरून जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले तर नागरिकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे त्रुटी असलेल्या सातबारे उतारे ब्लॉक करण्यात आले असून या सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवले आहेत.

राज्य सरकार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने ई-फेरफार प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील 2 कोटी 54 लाख सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास 98.50 टक्‍के सातबारा उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. अद्यापही 3 लाख 59 हजार सातबारा उताऱ्यांमध्ये विसंगती आणि त्रुटी असून त्यापैकी 67 हजार सातबारा उताऱ्यांमध्ये क्षेत्राची नोंद चुकीची असल्याचे समोर आले आहे.

मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून त्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. राज्यात सहा विभाग असून प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत चुकीची आहे. त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या आहे.

अशा सुमारे 46 प्रकाराच्या विसंगती असल्याचे दिसून आले आहे. त्या निश्‍चित करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांची जबाबदारी प्रांत अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. तसेच तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन केले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा ई फेरफार प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.