पर्यटनाचा मुख्य दरवाजाच ‘ब्लॉक’

भूगावातील वाहतूक कोंडीने पर्यटकांच्या आनंदावर विरजण : अनेकजण माघारी

पुणे – जोरदार पाऊस त्यात वीकेन्डमुळे पौड, मुळशी, लवासा आणि ताम्हिणी घाटात जाणाऱ्या पर्यटकांनी रविवारी सकाळपासून मुळशी-पौड रस्त्यावर गर्दी केली. या पर्यटन मार्गावरील “मुख्य प्रवेशद्वार’ असलेल्या भूगाव येथे मोठे खड्डे, अरुंद रस्ता आणि वाहतुकीचे ढिसाळ नियोजन यामुळे यावेळीही पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. काही पर्यटकांनी वाहतूक कोंडी पाहून पर्यटनाचे स्थळच बदलले.

सध्या पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह जिल्ह्यातील विविध भागातून पर्यटक इकडे येतात. पळसे येथील धबधबा, लवासा, हाडशी, तुंग-तिकोणाची खिंड, ताम्हिणी घाट, गिरीवन याठिकाणी पर्यटक आवर्जून येतात. त्यासाठी चांदणी चौकातून भुगावमार्गे मुळशीमध्ये प्रवेश करावा लागतो. त्यामुळे “भूगाव’ हे मुळशीचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाते. येथून जाणारा रस्ता अरूंद असून, त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रविवारी (दि. 28) सकाळपासून वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता “ब्लॉक’ झाला. 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. जवळचा पर्यायी रस्ता नसल्याने सर्व वाहने याच रस्त्याने येतात. त्यामुळे व्यवस्थेचे तीन-तेरा होतात. ही कोंडी सोडविण्यासाठी गावातील काही तरुण स्वयंसेवक मदत करत होते. तर वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस कर्मचारीही पुरेसे नसतात.

पर्यटन क्षेत्रासाठी रस्ते सुधारा
मुळशी आणि ताम्हिणी घाटातील पाऊस, निसर्ग, धबधबे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. मात्र, भूगाव, माताळवाडी, पिरंगुट आणि ताम्हिणी घाटातील रस्ते खराब असल्यामुळे अनेकवेळा पर्यटन वाहतूक कोंडीतच जाते. या भागात नवनवीन हॉटेल्स, फार्महाऊस उभे राहिले. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढावी, यासाठी किमान रस्ते तरी चांगले असावेत, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)