पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 26 जानेवारीनिमित्त एक दिवसाचा पोलीस अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना बनविण्याचा उपक्रम राबविला. त्यात अंध असलेल्या रिना पाटील या एक दिवसाच्या पोलीस आयुक्त, एकल माता ज्योती माने एक दिवसाच्या अपर आयुक्त तर विद्यार्थी दिव्यांशू तामचिकर पोलीस उपायुक्त बनला. या सुखद धक्क्यामुळे पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारणारे तिघेही भारावून गेले.
सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अधिकारी होण्याचा अनुभव यावा. यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात असलेली भीतीची दरी कमी होऊन आदराची भावना वाढीस लागावी. तसेच नागरिकांना देखील पोलिसांची कर्तव्ये, शिस्तबद्ध काम, आव्हाने यांची ओळख व्हावी, यासाठी “एक दिवसाचा पोलीस अधिकारी’ हा उपक्रम पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबवला.
दुपारी एक वाजताच्या सुमारास हा सोहळा पार पडला. त्या वेळी पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात वरील तीनही विशेष अतिथी चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनातून दाखल झाले. तेव्हा स्वतः कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे स्वागत केले. तर पोलीस दलातील बॅंड पथकाने सलामी देत गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर तिघेही जण कार्यालयात दाखल झाले.
दृष्टिहीन असलेल्या रिना पाटील यांना एक दिवसाचे पोलीस आयुक्त बनविण्यात आले. एक दिवसाचा पदभार पाटील यांच्याकडे सोपविताना स्वतः पोलीस आयुक्तांनी पाटील यांना सॅल्युट करून त्यांचे स्वागत केले. तसेच जिम ट्रेनरचे काम करणाऱ्या ज्योती माने यांच्याकडे एक दिवसासाठी अपर पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला. माने यांचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सॅल्युट करत स्वागत केले. पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांचा देखील एक दिवसाचा पदभार विद्यार्थी दिव्यांशू तामचिकर याच्याकडे देण्यात आला.
शहर पोलीस दलातील सर्वोच्च स्थानी एक दिवसासाठी का होईना पण काम करता येत असल्याने एक दिवसासाचे तीनही पोलीस अधिकारी भारावून गेले. पोलीस आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त आणि उप आयुक्तांच्या खुर्चीत या तिघांनाही बसवून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बाजूला बसून त्यांना पोलिसांचे काम समजावून सांगितले.
पोलीस आयुक्त झालेल्या रीना पाटील म्हणाल्या, “”या क्षणाचा स्वप्नातही विचार केला नव्हता, आम्ही पूर्णतः अंध असल्याने फक्त पोलिसांबद्दल ऐकू शकतो. पोलीस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात. कुठलाही स्वार्थ किंवा न्यूनगंड न बाळगता पोलीस मदत करतात. कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच महिला सुरक्षित राहतील.”
अपर पोलीस आयुक्त झालेल्या ज्योती माने म्हणाल्या, “पतीच निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. आज जेव्हा हा सन्मान स्वीकारला तेव्हा अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली.” पोलीस उपायुक्त (गुन्हे) झालेला दिव्यांशू तामचिकर म्हणाला, “माझं दहावीपर्यंतच शिक्षण ज्या वस्तीत झाल तिथे खूप घाण मानसिकतेची लोकं होती. आता महाविद्यालयात जाईल. आज इथे खोटा पोलीस झालो असलो तरी भविष्यात खराखुरा पोलीस अधिकारी हाईल.”