माढ्याच्या तिढ्याला गोरे बंधूंचा विळखा

गोरेबंधुंची भूमिका निर्णायक ठरणार, राष्ट्रवादीची मात्र कोंडी

सातारा – माढा मतदार संघातील तिढा वाढल्याने कोणत्याच राजकीय पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. या मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. परंतु, माढ्यातील राजकीय परिस्थिती पाहता त्यानी या मतदार संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

माढ्यातील राजकारण हे दिवसेंदिवस अधिकच गुतांगुतीचे होत असल्याने राजकीय नेत्यांनाही या मतदार संघात कोणता निर्णय घ्यावा हे उमजेना. माढा मतदार संघ हा राजकीयदृष्ट्या संमिश्र विचारांचा गड आहे. विधानसभेच्या 6 मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना, शेकाप पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूकही रंगतदार ठरणार आहे. सध्या तरी माण खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यानी आक्रमक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी पक्षापुढे अचडणी वाढल्या आहेत. या मतदार संघात गोरे बंधूची रणनिती ही माढा लोकसभा मतदार संघात महत्वपूर्ण ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यातील माण खटावच्या भूमीत एकेकाळी स्वर्गीय सदाशिवराव पोळ (तात्या) यांचा शब्द हा प्रमाण मानला जात होता. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचा मोठा दबदबा होता. जवळपास 40 वर्षाहून अधिक काळ एकहाती सत्ता त्यांच्याकडे होती. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करणे यात त्यांचा हातखंडा होता. मुळात माण मतदार संघ त्या काळात राखीव असल्याने त्यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांना निवडून आणले हा इतिहास आहे.

मात्र स्वर्गीय सदाशिवराव पोळ (तात्यांच्या) कार्यकालानंतर गोरे बंधूनी या मतदार संघात मोठी मुसंडी मारली. आमदार जयकुमार गोरे यानी या मतदार संघात स्वत:चे प्राबल्य वाढवत कॉंग्रेस गड मजबूत केला. अर्थात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी वनमंत्री मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यानी अखंड साथ देत आमदार जयकुमार गोरे याना बळ दिले. मिळालेल्या संधीचा लाभ उठवत संपूर्ण माण खटाव मतदार संघात आमदार जयकुमार गोरे यांनी विकास व प्रगतीच्या जोरावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. संपूर्ण माण तालुका कॉंग्रेसमय करण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यानी घेतलेले परिश्रम आज कामी येत आहेत.

ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यावर वर्चस्व मिळविताना राष्ट्रवादीच्या नेत्याना त्यानी झुंजविले आहे. आमदार जयकुमार गोरेचा झंझावात रोखण्यासाठी राष्ट्रवादींच्या नेत्यांनी शह प्रतिशहाचे अनेक डावपेच लढले. परंतु, त्यांना फारसे यश आले नाही. विधान परिषदचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर त्यांच्या विरोधात उघडउघड राजकीय लढाईच पुकारली होती.

परंतु त्यांनाही त्यात फारसे यश आले नाही. आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे सर्व डावपेच उधळून लावताना त्यांच्याच मतदार संघात त्यांना खुले आव्हान दिले होते. आमदार जयकुमार गोरे यांच्यापुढे राष्ट्रवादीचे नेते मंडळी मात्र हातबल झाले हे तितकेच सत्य आहे. अखेर घरगुती फोडाफोडीची रणनिती वापरुन राष्ट्रवादीच्या नेत्यानी शेखर गोरे यांना आपल्या तंबूत सामील करुन घेतले. परंतु फोडाफोडीच्या राजकारणात शेखर गोरे यांनाही राष्ट्रवादीने फारशी ताकद न दिल्याने अखेर त्यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यपध्दतीवर प्रहार केला.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यानी माढा मतदार संघाची रणनिती ठरविण्यासाठी फलटण येथे आयोजित केलेल्या संवाद मेळव्यात शेखर गोरे यानी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत बंड पुकारले. माढ्याच्या राजकारणाला हा निर्णय खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा ठरला आहे. माढ्याचे राजकारण हे सध्या तरी आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्याभोवती फिरत असून या दोन्ही गोरे बंधुच्या निर्णयावरच माढा लोकसभा मतदार संघातील विजयाची पतका फडकणार अशी चिन्हे आता दिसू लागली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)