लंडन – भारतात कोविशिल्ड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ऑक्स्फर्ड- ऍस्ट्राझेन्काच्या लसीवर अगोदरच आरोप होत असताना आता या लसीबाबत आणखी एक नकारात्मक बातमी आली आहे.
ब्रिटनमध्ये ही लस दिल्यानंतर तिघांना झटका आला व त्यातील एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची बातमी असून ही लस त्यामुळे पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ऑक्स्फर्ड ऍस्ट्राझेन्काची लस घेतल्यावर रक्तात गुठळी निर्माण होत असल्याचा आरोप अगोदर करण्यात आला होता. त्यानंतर काही देशांनी या लसीच्या वापरावर बंदीही घातली होती. त्यानंतर आता ही नवी बातमी आली आहे.
तीशीतल्या दोन आणि एका चाळीशीतल्या महिलेला ही लस दिल्यानंतर त्रास झाल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे व ऑक्सिजनचा पुरवठा होणे थांबल्याचे आढळून आले. अशा प्रकाराची घटना प्रथमच घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत बोलताना येथील विद्यापीठातील एका तज्ज्ञाने सांगितले की असे काही होणे हा दुर्मिळ प्रकार असून करोनाची लागण झाल्यावर लस घेतली असल्यास असे होण्याचा धोका असतो. तसेच ज्यांना लस देण्यात आली आहे त्यांच्यावर 4 ते 28 दिवस लक्ष ठेवले जावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.