रायपूर – रायपूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमधील एका डब्यात भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपराचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची माहिती मिळताच घटस्थळी रेल्वे, सीआरपीएफचे अधिकारी दाखल झाले आहेत.
विकास चौहान, रमेश लाल, रवींद्र कर, लक्ष्मण, सुशील आणि दिनेश कुमार पाईकर अशी जखमी जवानांची नावे आहेत. त्यापैकी विकास चौहान हे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीआरपीएफची 211 वी बटालियन स्पेशल ट्रेनने रवाना होणार होती. या जावानांना घेऊन जाणारी ट्रेन रायपूर रेल्वे स्थानकात उभी होती. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज आला. यानंतर ट्रेनमधील एका डब्यात स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफ जवानाच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे. डिटोनेटर आणि काडतूस हे जवानांनी काळजीपूर्वक ठेवले नव्हते. ट्रेनमध्ये प्रवेश करत असताना डिटोनेटर बॉक्स जवानाच्या हातातून सुटला त्यानंतर स्फोट झाला. मात्र, या माहितीला अद्याप कुणीही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.