कला, सांस्कृतिक क्षेत्रासाठी पुन्हा ‘ब्लॅकआऊट’

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा उलाढालीवर मोठा परिणाम

पुणे – मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सांस्कृतिक क्षेत्राचा पडदा उघडला. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा एकदा “ब्लॅकआऊट’ झाला आहे. याचा आर्थिक फटकादेखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे एकीकडे करोनाबाबतची खबरदारी, काळजी आणि तर दुसरीकडे अर्थचक्र याबाबतची चिंता निर्माण झाली असून आगामी नियोजनाबाबतदेखील धास्ती असल्याची भावना सांस्कृतिक क्षेत्राकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह बंद ठेवले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील रद्द केले आहेत. याशिवाय मालिका, चित्रपट आदींचे चित्रीकरणावरदेखील बंधने आहेत. त्यामुळे नाटक, चित्रपट, वाहिन्या, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वच क्षेत्रावर पडदा पडला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे अर्थचक्रदेखील ठप्प झाले आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे हा पडदा केव्हा उघडणार, याबाबत सांस्कृतिक क्षेत्राकडून धास्ती व्यक्त करण्यात येत आहे.

आजपर्यंतचे 39 कार्यक्रम रद्द
पुणे महापालिकेच्या हद्दीतील नाट्यगृहे 3 एप्रिलपासूनच बंद झाली. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आदी पालिकेच्या सभागृहांमध्ये 3 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीतील सुमारे 39 कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामध्ये नाटकांचे प्रयोग, संगीत, नृत्याचे कार्यक्रम आदींचा समावेश आहे. याशिवाय 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक नाट्यगृहात सुमारे 2 कार्यक्रम नियोजित होते. कार्यक्रम रद्द झाल्याचा फटका नाट्य निर्मिती संस्थांप्रमाणे पालिकेलादेखील बसला असून, पालिकेचे सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लॉकडाऊनच्या नैराश्‍येमुळे व्यावसायिकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. आत्महत्या हा पर्याय नाही. संयम बाळगला पाहिजे, ही जबाबदारी आहे. घरात बसून नकारात्मक विचार करून, काही होणार नाही. कलाकारांनी संयम बाळगून, पर्याय शोधले पाहिजेत. आर्थिक बाजू चांगली असणारे व्यवसाय, कंपन्या आणि संस्थांनीदेखील सामाजिक बांधिलकी जपत कलाकार आणि संबंधित संस्थांनादेखील मदत होईल. त्यामुळे हा पर्याय निवडणे उचित ठरेल.
– वंदन नगरकर, एकपात्री कलाकार


पुढील आठवडाभर काही सुरू करणे अवघडच आहे. पण, 15 दिवसांनंतर परवानगी मिळावी. निर्मात्यांवर याचा ताण येत आहे. सरकारचे नियम आणि अर्थचक्र अशा दोन्ही मध्ये सध्या आपण अडकलो आहेत. शूटिंगच्या प्रक्रियेत सुमारे 70 टक्के कर्मचारी हे दैनंदिन मानधनावर काम करतात. त्यामुळे त्याबाबत अधिक वाईट वाटते. जूननंतर सुरू झालेल्याबाबत शूटिंगमध्ये करोना प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्यात येत आहे.
– महेश लिमये, दिग्दर्शक


15 दिवसांच्या संचारबंदीमुळे पोस्ट प्रोडक्‍शन, तांत्रिक बाबी, आगामी प्रोजेक्‍टबाबत काम करण्यासाठी किंवा गृहपाठ करण्यासाठी हा चांगला कालावधी आहे. पुन्हा एकदा उंच झेप घेण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते, त्यापैकी आत्ताची स्थिती आहे. फायद्याबरोबरच यामुळे आर्थिक फटकादेखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. अनेकांची उत्पन्नाची साधने ठप्प झाली आहे. पुन्हा हे केव्हा पूर्ववत होणार, याबाबत धास्ती कायम आहे.
– संकेत अनगरकर, क्‍लबचर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.