कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी 23 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग क्र. तीनमधून सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले होते. त्यातील एक अर्ज संबंधित उमेदवाराने मागे घेतल्याने काळे गटाच्या कमलबाई प्रकाश कोळपे यांची निवड बिनविरोध झाली.
काळे गटाचे सरपंचपदाचे व सदस्यपदाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर काळे गटाने एकहाती सत्ता मिळवली. परंतु काही सदस्य अपात्र ठरल्यामुळे सहा जागांसाठी फेर मतदान होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक, प्रभाग क्रमांक तीन व चारमध्ये दोन व प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक, अशा सहा जागांसाठी निवडणूक होणार होती.