पिंपरी – एका सायकलपटूच्या पायावरून डंपर गेल्याने तो जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. आजूबाजूने जोरात वाहने जात होती. आपल्या अंगावरून आणखी एखादे वाहन जाईल, या भीतीने तो मला रस्त्यावरून बाजूला घ्या, असे बघ्यांना सांगत होता. प्रत्यक्ष समोर मृत्यू दिसत असताना आणि जिवाच्या अकांताने आवाज देत असतानाही सर्व इंद्रिय शाबुत असणारी परंतु माणूसकी हरवलेली बहिरे तेथे असल्यामुळे कोणीच त्याला मदतीचा हात पुढे केला नाही. उलट तिथे जमलेल्या गर्दीतील लोक त्याची शुटिंग आणि फोटो काढत होते. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना सोमाटणे फाट्याजवळ गुरुवारी (दि. 9) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
संदीप सुहास कुलकर्णी (रा. बिजलीनगर, चिंचवड) असे जखमी सायकलपटूचे नाव आहे. कुलकर्णी यांना सायकल चालविण्याची आवड असल्याने ते दररोज किमान 50 किलोमीटर सायकल चालवितात. ते नेहमीप्रमाणे बिजलीनगर ते सोमटणे फाटा असा सायकलने प्रवास करीत परत माघारी फिरले. ते मुंबई-पुणे महामार्गावरून परत येत असताना घोराडेश्वर डोंगराजवळील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात नाक्याजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरमुळे रस्त्यावर पडले.
काही कळण्याच्या आतच त्यांच्या पायावरून डंपरचे चाक गेले. यामुळे दोन्ही पायांचा क्षणार्धात चक्काचूर झाला. अपघातामुळे त्यांच्या पायातून रक्तस्त्राव होत होता. त्यातच भरधाव वेगातील वाहने हॉर्न वाजवत त्यांच्या बाजूने जात होती. एखादे वाहन पुन्हा अंगावरून जाण्याची शक्यता होती. जखमी अवस्थेत ते हाताच्या साहाय्याने रस्त्यावरून बाजूला जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र अपघातामुळे त्यांच्या अंगातील त्राण गेले होते. अपघातानंतर घटनास्थळाच्या एका बाजूला बघ्यांनी गर्दी केली होती. अपघातात दोन्ही पाय गेल्यामुळे ते भेदरलेल्या अवस्थेत त्याच ठिकाणी बसून होते. मला मदत करा असे रस्त्यावरून गर्दीतील लोकांना सांगत होते. मात्र कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही.
जखमीसाठी ते ठरले देवदूत
पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलातील सब ऑफिसर प्रताप चव्हाण हे गर्दी पाहून थांबले. त्यांनी जखमी अवस्थेतील कुलकर्णी यांना रस्त्यावरून बाजूला घेतले. सर्वप्रथम यांनी रुग्णवाहिकेला कॉल दिला. त्यानंतर कुलकर्णी यांच्याकडे त्यांच्या घरच्यांचा मोबाइल नंबर मागितला. तसेच घरच्यांना अपघाताबाबत कल्पना दिली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रुग्णवाहिका आल्यावर कुलकर्णी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात पाठविले. चव्हाण हे जखमींकरिता देवदूत ठरल्याची चर्चा गुरुवारी शहरात होती.