औरंगाबाद – करोनाविरोधातील लढा बळकट करण्यासाठी राज्यात मोठया प्रमाणात लसीकरण मोहिम राबविली जात असून अद्यापही 50 टक्के नागरिक करोनाच्या लशीपासून वंचित आहे.
यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच रांगा दिसून येत आहे. तरी देखील डोस मिळेल याची शाश्वती नसल्याने काही जण पदरमोड करून खासगी केंद्रावर लस घेत आहे. तर दुसरीकडे करोना लशीचा काळाबाजार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये दररोज सरकारी लसीकरण केंद्रावरच्या 30 ते 40 लसी चोरून, त्याची चोरीछुपे विक्री करणारा गणेश दुरोळे एका छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चोरलेल्या लशीची विक्री करण्यासाठी गणेश दुरोळे काही कामगारांना एका खोलीत बोलवत असे आणि 300 रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येकाला लस टोचत असे. हा प्रकार एका स्टिंग ऑपरेशनमुळे चव्हाट्यावर आला आहे.
औरंगाबादच्या वाळूजजवळच्या साजापूरमधला आरोग्य सेवक गणेश दुरोळे लशी चोरुन त्याची विक्री करत होता. या प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी गणेश दुरोळेला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोग्य सेवक गणेश दुरोळेला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात जे इतर कोणी दोषी आढळतील किंवा निष्काळजीपणा केलेला असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. राज्यात इतरत्र असा विषय होत नसावा. मात्र राज्यातील संपूर्ण लसीकरण केंद्रावर कडक नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आणि चुकीची अशा गोष्टी घडू नयेत याची काळजी घेतली जाईल.
– राजेश टोपे, आरोग्य मंत्री