रेमेडिसिविर इंजेक्‍शनचा काळाबाजार, दोन “पंटर’ पोलिसांच्या जाळ्यात

पुणे – गंभीर करोना बाधितांना उपचारांसाठी रेमेडिसिविर इंजेक्‍शनची मात्रा प्रभावी ठरत आहे. पण, याचाच गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. अशाच दोन “पंटर’ला नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात करोनाचा कहर झाला आहे. तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि वैद्यकीय सुविधांच्या तुलनेत दररोज हजारावर नवे बाधित आढळत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. तर, काही अत्यवस्थ रुग्णांना डॉक्‍टर रेमेडिसिविर इंजेक्‍शन देत आहेत. पण, काही औषध विक्रेते आपल्या पंटरच्या माध्यमातून गिऱ्हाईक गाठत आहेत.

जवळपास साडेचार हजार रुपये छापील किंमत असलेले हे इंजेक्‍शन तब्बल 7 हजार रुपयांना विकताना वीरभद्र स्वामी व बाबाराव पडोळे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर  त्यांचा “बोलविता धनी’ दुकान बंद करून गायब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

या दोन दलालांला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने डमी ग्राहक तयार केले होते. त्यांनी मोबाइलवर कॉल करून या दलालांना एका विशिष्ट स्थळी बोलवले होते. तेथे पोलीसही साध्या वेशात तैनात होते. डमी ग्राहक संबंधित दलालाकडून औषध स्वीकारून त्यांना पैसे देताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.