भोरमध्ये रेशनिंग धान्याचा काळा बाजार

51 पोती धान्यासह टेम्पो ग्रामस्थांनी पकडला

कापूरहोळ (वार्ताहर): कांजळे (ता. भोर) येथील रेशनिंग दुकानामधील गहू आणि तांदळाची 51 पोती काळ्या बाजारात टेम्पोद्वारे नेत असताना ग्रामस्थांनी तो टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. येथील रेशनिंग दुकान (रोटेशन शॉप) चालवणाऱ्या बचत गटाच्या महिला आणि खरेदी करणाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 13) दुपारी साडेतीनच्या सुमारास कांजळे (ता. भोर) येथे श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या रेशनिंग दुकानाच्या चालक अनुसया जाधव आणि नंदा कामठे यांच्याकडून 39 गव्हाची आणि 12 तांदळाची प्रत्येकी 50 किलोची पोती एवढा रेशनिंगचा माल नरेंद्र जयंतीलाल मोदी (रा. किकवी, ता. भोर) यांना विकला होता.

मोदी यांनी बेकायदेशीररित्या काळ्या बाजाराच्या दराने खरेदी करून त्याची खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी हा सर्व माल दुसऱ्या पोत्यांमध्ये भरून पिकअप टेम्पो (एमएच 11 बीएल 4845) मधून वाहतूक करून नेत असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली आणि त्यांनी टेम्पोसहीत हा सर्व माल पकडला.

या प्रकरणी भोरचे पुरवठा निरीक्षक प्रशांत ओहोळ यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार टेम्पो चालक सिध्देश्वर सुरेश रोकडे (रा. गोपाळपेठ, सातारा), खरेदीदार नरेंद्र मोदी (रा. किकवी) आणि रेशनिंग मालाची विक्री करणाऱ्या नंदा कामठे आणि अनुसया जाधव यांच्यावर जीवनावश्‍यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून रोकडे आणि मोदी यांना अटक करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.