शिर्डी – लॉकडाऊनच्या काळात शिर्डीचे अर्थकारण ठप्प झाले होते. त्यामुळे साईभक्तांच्या जीवावरच प्रत्येकाची रोजीरोटी अवलंबून आहे, हे याच कालावधीत सिद्ध झाले. आठ महिन्यांनंतर शासनाच्या आदेशानुसार साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. मात्र साई संस्थानने भाविकांच्या दर्शनाचे नियोजन करताना अनेक त्रुटी ठेवल्याने शिर्डीत सशुल्क पासेसचा काळाबाजार होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान साई संस्थान व शिर्डी पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
ऑनलाइन दर्शन व आरती पासेस मिळण्याची सुविधा व सक्ती साई संस्थानने केली असली, तरी अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे ही व्यवस्था कोलमडते. मात्र त्याला पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे निःशुल्क पासेस घेण्यासाठी भाविकांची दोन ते तीन किलोमीटर रांग गर्दीच्या दिवशी असते. त्यामुळे अनेक भाविक एजंट (पॉलिशवाले) यांच्या जाळ्यात अडकतात व दोनशे रुपयांचा पास पाच ते दहा हजार रुपयांना विकत घेतात. त्यामुळे या पासेसचा धंद्यात अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या असून, हे तरुण साई संस्थांनच्या परिसरात गेट नं. 1 व बायोमेट्रिक पास काउंटर परिसर, बसस्थानक, द्वारावती भक्तनिवास, पाचशे रुम, साई आश्रम याठिकाणी रेंगाळत असतात.
हे एजंट भाविकांना अव्वाच्या सव्वा भावात पास विकतात. त्यांना काही प्रमाणात सुरक्षारक्षक व पास काउंटरवरील कर्मचार्यांचा हलगर्जीपणा व मिलीभगत, यामुळे मदतच होत आहे. त्यामुळे या घटनांत वाढ होत आहे. शिर्डी पोलिसांचे या गंभीर प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, तर साई मंदिरातील अतिरिक्त असणारे पोलीस दिवसभर मोबाइलवर व्यस्त असल्याने त्याचाच गैरफायदा या टोळ्या घेत असून, त्यांचा सर्रास मंदिर परिसर व वरील ठिकाणी वावर वाढतच आहे.
तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकाराला पायबंद घातला होता. मात्र सध्याच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे शिर्डीत अवैध व्यवसायांसह दर्शन पास विक्रीचा धंदा जोरात आहे. या व्यवसायात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण शिरल्याने शिर्डीत भाविकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, तर साई संस्थान व पोलीस प्रशासन यांचा समन्वय नसल्याने या घटना होत असल्याचा आरोप भाविक करत आहेत. यास लवकर पायबंद बसला नाही, तर शिर्डी गुन्हेगारीचे व लुटमारीचे ठिकाण व्हायला वेळ लागणार नाही.
मंदिर परिसरात संस्थान सुरक्षारक्षक व शेकडो पोलिसांच्या डोळ्यांदेखत भाविकांची लूट होत आहे. त्यामुळे या गंभीर घटनेची रीतसर तक्रार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे करणार आहे.
– कैलासबापू कोते,
प्रथम नगराध्यक्ष, शिर्डी