हिंजवडी पोलिसांची केली कारवाई; 145 गॅस टाक्या जप्त
हिंजवडी – घरगुती वापराच्या एलपीजी गॅसने भरलेल्या टाक्यांमध्ये अदलाबदल करत मोठ्या सिलिंडरमधील गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरून बेकायदेशीर गॅसपुरवठा करणाऱ्या एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
संताजी तानाजी माने (वय 23, रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 145 टाक्या व 81 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पत्रकारांना दिली.
माणमधील भोईरवाडी येथे आई गॅस एंटरप्राइजेस नावाचे दुकान आहे. तेथे हा कारभार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी सापळा रचून माहितीची खात्री केली असता, ती खरी आढळून आल्याने पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. आनंदा भोईर यांच्या मालकीच्या दुकानात माने हा आरोपी असा उद्योग करत होता. त्यास अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोन उपायुक्त आनंद भोईटे, गुन्हे शाखा सह आयुक्त आर. आर. पाटील, वाकड विभाग सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, मच्छिंद्र काळे, महेश शिंदे, इसाक शेख, रवी पवार, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली आहे.