औंध -बाणेर मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनधिकृत खोदाई सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. परंतु, पालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. केबल टाकण्यासाठी संबंधीत कंपन्यांचे ठेकेदार खोदाई करीत आहेत. परंतु, पालिका व पोलीस यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे संबंधीत कामगार बिनधास्तपणे खोदाईचे काम करीत आहेत.
महापालिकेला खोदाई कामासाठी तसेच त्यानंतर दुरूस्ती करून देण्यासाठी होणारा खर्च टाळण्यासाठी संबंधीत कंपनीचे ठेकेदार स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून रात्रीच्या वेळी खोदाईचे काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खोदाईचे काम थांबवून विनापरवाना खोदाई करणाऱ्यांना पोलीस व पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्या ताब्यात एक ट्रॅक्टर (एमएच 14 एक्स 9128), ब्रेकर, पाइप व बलेरो गाडी असाऐवज पकडून दिला, तसेच महापालिका मुकादमाकडून बालेवाडी पोलीस चौकी येथे तक्रारही करण्यात आली. परंतु, कारवाई मात्र काहीच झाली नाही. त्यामुळे यातील गौडबंगाल वाढले आहे.
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना घर बसल्या “महसूल’ मिळत असला तरी महापालिकेचे मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यातच खोदाई करणारे केबल टाकून झाल्यानंतर निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजवत असल्यामुळे पदपथ व रस्ते उखडले गेले आहेत. ते दुरूस्तीसाठी महापालिकेला पुन्हा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आयुक्त विक्रम कुमार यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन विना परवाना खोदाई रोखावी, अशी मागणी होत आहे.
सदर घटना घडली त्यावेळी संबंधीत कामगारांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली, याची पोलीस तक्रार अधिकाऱ्यांनी नोंदवली आहे. पालिका पथ विभागामार्फत चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे पत्र व्यवहार करून हे काम कोणत्या कंपनीमार्फत करण्यात आले आहे, याचा शोध घेण्याचे कळविले आहे. कंपनीचे नाव समजल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. साधारणत: 400 मीटर खोदाई करण्यात आली आहे.
– संदीप चाबुकस्वार, पथविभाग अधिकारी, पुणे महापालिका