Saif Ali Khan attack । Bollywood : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पण सैफच्या घरी हा हल्लेखोर इतक्या सहज पणे कसा घुसला? तेवढ्याच सहजतेने हल्लाकरून तो तिथून कसा बाहेर पडला? या सारखे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांसह सर्वांनाच पडले होते. अखेर मुंबई पोलिसांनी ठाण्यातून हल्लेखोराला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
सैफ अली खानच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी सैफ अली खानने एक खासगी हाउसकीपिंग एजन्सी नेमली होती. याच एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेला आरोपी ‘मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास’ याने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळेस त्याने सैफच्या घराची पाहणी केली होती. ही बाब त्याच्या चौकशीतून समोर आली आहे.
तो सैफच्या घरी गेल्यानंतर त्याने संपूर्ण घराची रेकी केली होती. शिवाय त्याच वेळी सैफच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन त्याने आखला होता. त्यासाठी त्याने सैफच्या घराचा कोपरा अन् कोपरा पाहून घेतला होता. घरात कसे घुसायचे, कुठून घुसायचे हे त्याने याच वेळी पाहून घेतले होते, असे पोलिस चौकशीत समोर आले आहे. तसेच हा आरोपी बांगलादेशातील रहिवासी असून, तो एक राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू देखील आहे. आणि त्यामुळेच त्याला सैफवर ताबा मिळवण्यात यश मिळालं. स्वतः आरोपीने याबद्दल खुलासा केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर एकंदरीत बॉलिवूड सेलिब्रिटींची सुरक्षा आणि मुंबईतील वांद्रे परिसरात सतत होणारे हल्ले हा मुद्दा चर्चेत आला आहे. माजी मंत्री आणि अनेक सेलिब्रिटींसोबत जवळचा संबंध ठेवणारे बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता त्यानंतर सैफच्या घरात झालेला हल्ला. या प्रकरणांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
या घटनांमुळे वांद्रे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वीच सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांच्या सोबत अश्या घटना घडल्याचं आपण पाहिलं आहे. वांद्रे परिसरात बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची घरं असून, सध्या याच परिसरात हे तीन हाय-प्रोफाइल गुन्हे घडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक आणि कलारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी देखील अनेक बड्या कलाकारांना टार्गेट गेल्याच दिसून आलं आहे. खंडणी, धमकी, गोळीबार, खून अश्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये काहींना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे तर काही जण थोडक्यात बचावले आहे. कोण आहेत असे सेलिब्रिटी यावर सुद्धा आपण एक नजर टाकणार आहोत. तसेच मुंबईतील हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या वांद्रे परिसरात कोणते कलाकार राहतात आणि तेथील सध्याची सुरक्षा यंत्रणा कश्या पद्धतीने काम करते याबद्दल स्वतः सेलिब्रिटींनी काही खुलासे केले आहेत.
हायप्रोफाईल वांद्रे पारिसरातील सेलिब्रिटींची घरं :
सलमान खान – गॅलेक्सी अपार्टमेंट
शाहरुख खान – मन्नत
आमिर खान – बेला विस्टा अपार्टमेंट
रणबीर कपूर – कृष्णा राज
आलिया भट्ट – वास्तू
संजय दत्त – इंपिरिअल हाइट्स
रेखा – सी स्प्रिंग्स
झीनत अमान – झीनल विला
अनन्या पांडे – पांडे हाऊस
फरहान अख्तर – विपासना
सायरा बानो – दिलीप कुमार रेसिडेन्स
मलायका अरोरा – 81 ओरिएंट
यापूर्वी झालेल्या घटनांवर एक नजर :
सलमान खान : सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणाच गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोईविरोधात गुन्हा दाखल आहे. बिष्णोईने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती.
सुनील पाल : डिसेंबर 2024 मध्ये स्टँडअप कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातले आठ लाख रुपये मिळाल्यानंतर सुनीलला मेरठमधील रस्त्यावर त्यांनी सोडून दिलं.
शाहरुख खान : बॉलिवूडच्या किंग खानला अनेकदा अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आहेत. गँगस्टर अबु सालेमकडूनही त्याला धमकावण्यात आलं होतं. त्याला सतत धमकीचे फोन येत होते.
प्रिती झिंटा : ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाच्या वेळी प्रिती झिंटाला खंडणीसाठी धमकावण्यात आल्याचं सांगितलं होतं. धमकी देणाऱ्यांनी तिच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती.
निर्माता राजीव राय : यांच्यावर हल्ला व अपहरणाचा प्रयत्न 1997 मध्ये झाला होता. अबु सालेमने त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली होती. पोलीस सुरक्षा रक्षकामुळे हा प्रयत्न फसला.
कुणाची हत्या झाली तर कुणाला मिळाले जीवनदान :
राकेश रोशन : 2000 मध्ये ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटानंतर राकेश रोशन यांना खंडणीसाठी अबु सालेमकडून धमक्या आल्या होत्यात त्यानंतर 21 जानेवारी 2000 मध्ये दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली, आणि छातीला गोळी चाटून गेली होती. पण या घटनेत त्यांचा जीव वाचला.
मुश्ताक खान : नोव्हेंबर 2024 अभिनेता मुश्ताक खान यांचे कथितपणे अपहरण झाले, त्यांना मेरठमध्ये एका कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावण्यात आले होते. आणि त्यांच्या मोबाईलवरून 2 लाख रुपये हस्तांतरित केले. एक दिवसानंतर खान सुटून पुन्हा मुंबईत परतले.
निर्माता मुकेश दुग्गल : निर्माता सिद्धीकी यांच्याप्रमाणे दुग्गल यांचीही अबु सालेमने अंधेरी येथे हत्या घटवून आणली होती.
गुलशन कुमार : टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची 1997 मध्ये हत्या करण्यात आली होती. गुजशनकुमार कुमार मुंबईतील अंधेरीतील शिवमंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ प्रार्थनेसाठी जायचे. त्यावेळी 12 ऑगस्ट 1997 ला त्यांना हेरून गोळीबार करण्यात आला होता. त्यापूर्वी त्यांना दोनवेळी त्यांना धमकीचे फोन आले होते.
निर्माता दिनेश आनंद आणि अजित दिवानी : 14 फेब्रुवारी 2001 रोजी निर्माता दिनेश आनंद आणि 30 जून 2001 रोजी निर्माता अजित दिवाणी यांची अबु सालेमने हत्या घडवून आणली होती.
या कलाकारांना दिली गेली सरकारी सुरक्षा :
– 2024 मध्ये सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करत Y+ सुरक्षा देण्यात आली. गँगस्टर लॉरेंस बिश्नोई टोळीकडून अभिनेत्याला वारंवार धमक्या येऊ लागल्या.
– 1990 च्या दशकात अभिनेता शाहरुख खानाला अबु सालेमकडून वारंवार धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्या अजूनही सुरूच असल्याचं सांगण्यात येत. 2023 ला महाराष्ट्र सरकारडकून शाहरुखला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे.
वांद्रे परिसरातील सुरक्षेबद्दल स्वतः कलाकार सांगतात…
करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या समोरच्या इमारतीत राहणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने इमारतीच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल वक्तव्य केलं आहे. करिश्मा सांगते की, “मी गेल्या वर्षापासून इमारतीच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करत आहे. वॉचमनला योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. अशा आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी ते पूर्णपणे तयार नाहीत.
जर चोर घुसला तर कुटुंब स्वतःचे संरक्षण कसे करणार? हे भयानक आहे. घडलेल्या घटनेनंतर इतर लोकं सावध होतील अशी अपेक्षा मी करते. अशा संकटाचा सामना करण्यास कोणतंही कुटुंब तयार नाही. आता माझ्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येईल, यावर माझा विश्वास आहे’. असं अभिनेत्री यावेळी म्हणाली आहे.
“होय मीच हल्ला केला…”; आरोपीने गुन्हा कबूल केला
आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाला, “होय मीच हल्ला केला…” आरोपीने स्पष्ट केलं की तो चोरीच्याच उद्देशाने सैफच्या घरात गेला होता. पण जेव्हा घरात गोंधळ निर्माण झाला, तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने सैफवर हल्ला केला. आरोपी खरं बोलतोय की खोटं हे सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याला क्राइम सीनवर घेऊन जाऊन सीन रिक्रिएट करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.