सेंट क्लाऊड: अमेरिकेत मध्य मिन्नीसोटा प्रांतात ब्लॅक हॉक जातीचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात या हेलिकॉप्टरमधील तिन्ही जण ठार झाले आहेत. हे हेलिकॉप्टर मेंटेनेन्ससाठी टेस्ट फ्लाईटवर उडवण्यात आले होते पण ते उड्डाणानंतर केवळ नऊ मिनीटातच अचानक कोसळले. या घटनेनंतर तेथे मदत पथके पाठवून हेलिकॉप्टरमधील तिघांचा शोध घेण्यात आला. या तिघांची नावे मात्र अजून जाहीर करण्यात आलेली नाहीत.
संबंधीत अधिकारी लष्करी वरीष्ठ अधिकाऱ्यांची वाट पहात असून ते आल्यानंतरच अपघाताचे कारण आणि मृतांविषयीची माहिती प्रसारीत केली जाणार आहे असे संबंधीत सूत्रांनी सांगितले. अपघाताच्या घटनास्थळाचे एरियल शुटिंग काही वाहिन्यांनी दाखवले. त्यात हेलिकॉप्टरचे भाग विस्तृती भागात विखुरले असल्याचे दिसत आहे.