नाणे मावळ, (वार्ताहर) – आलिशान चारचाकी गाड्या आणि त्या गाड्यांना काळ्या काचा लावून फिरणाऱ्या कारचालकांची मुजोरी मावळ तालुक्यात वाढत चालली आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणे, गाडीच्या काचा काळ्या करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण वाटू लागल्याने असे प्रकार मावळात वाढू लागलेत.
अनेकदा समाजकंटकांकडून गैरकृत्य, गुन्हे करण्यासाठी काळ्या काचांचा गैरवापर होण्याचा धोका असल्याने त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु बंदी असून देखील मावळ तालुक्यात कामशेत, नाणे मावळ, पवन मावळ, वडगाव, लोणावळा, तळेगाव भागात हे प्रकार वाढले आहेत.
वाहनचालक वाहनांच्या काचांना ‘टिन्टेड फिल्म’ (काळ्या रंगाची स्क्रीन) लावतात. अशा वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून काही महिन्यांपूर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली
पोलीस पथके चौकाचौकांत अशा वाहनांना रोखत फिल्म काढून टाकत दंडात्मक कारवाई करत होते. परंतु पोलिसांची कारवाई थंड झाल्यानंतर वाहनचालकांकडून पुन्हा हे प्रकार वाढू लागले आहेत.
न्यायालयाचे थेट निर्देश –
वाहनांच्या काचांना काळ्या फिती लावून काचेची पारदर्शकता कमी करण्याच्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. तेव्हापासून अशा प्रकारे वाहनांच्या काचांना काळ्या फिती लावल्याचे आढळून आल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते.
अत्यंत दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून किंवा काचांवर फिल्म चिकटवून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न वाहनचालकांकडून केला जातो. परंतु हा प्रकार गैर असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
मावळात कारवाई जवळपास शून्य
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात या नियमाचे उल्लंघन होताना दिसते. प्रत्येक चौकात, टोलनाक्यावर, गावखेड्यात, शहरातील चौकांत काळ्या काचा असणाऱ्या कित्येक गाड्या नजरेस येतात. फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या तर भरमसाठ असतात.
परंतु त्यांच्यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. गुंठामंत्री, स्थानिक लहान मोठे व्यवसायिक, पुढारी, पक्षाचे पदाधिकारी असे लोक या वाहनांचे मालक चालक असल्याचे आढळून येते.
त्यांच्यावर कारवाई करायला पोलीस धजावत नाहीत. कोर्टाची बंदी असतानाही तालुक्यात काळ्या काचेच्या गाड्या आणि फॅन्सी नंबर प्लेटची वाहने सर्रास दिसतात.
मावळात गुन्हेगारीमध्ये चोरी, हत्या, खून, दरोडे, प्राणघातक हल्ले अशा घटना ह्या आजमितीस होताना दिसतात. या गैरप्रकारात सहभागी गुंड, आरोपी, समाजकंटक हे अशाच काळ्या काचा असणाऱ्या वाहनांतून शक्यतो प्रवास करतात किंवा फॅन्सी नंबर प्लेट असणारी दुचारी, चारचाकी वापरतात.
त्यामुळे पोलिसांच्या तपासात आडकाठी निर्माण होते. त्यामुळे अशा वाहनांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. – एक नागरिक