बारामती – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत नगरपालिकेवर काळे झेंडे फडकवले आहेत.
बोनस मिळावा यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. आज (शुक्रवार) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मात्र तरीही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांपैकी कोणीही आंदोलकांना भेटण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून घोषणाबाजी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील काल कर्मचाऱ्याकडून निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अजूनही त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने कर्माचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.
सानुग्रह अनुदानाबाबत काही नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली मात्र तरी देखील तोडगा निघालेला नाही. अनुदान देण्याबाबत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. मात्र, याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. प्रशासनानं यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे.
तसेच या आंदोलनाचा शहरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही असे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले असताना बारामती नगरपालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना का देऊ शकत नाही, असा सवालही आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.