पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी “वॉर रूम’ कार्यान्वित झाली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत सोशल मीडिया टीम पोहोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पुणे शहरातील “वॉर रूम’ प्रदेश आणि केंद्रीय वॉर रूमला संलग्न असेल. पक्षाच्या शहरातील मुख्यालयातून या “वॉर रूम’चे काम चालणार आहे. शहरातील टीम तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी असेल. त्याच्या मदतीसाठी तेथे 10 जणांची टीम असेल. शहरात सुमारे 100 युवकांची टीम सोशल मीडियावर पक्षाचे काम करणार आहे.
फेसबुक, व्हॉट्स ऍप, ट्वीटर, इंस्टाग्राम आदींच्या माध्यमातून भाजप मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय व्हॉट्स ऍपचे ग्रुपही कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आठही आमदारांनी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कोणती विकास कामे केली आहेत, याचीही माहिती मतदारांना मिळणार आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपचा सोशल मीडिया सेल पोहोचणार आहे, अशीही माहिती मिसाळ यांनी दिली.