अनंतकुमार यांच्या पत्नीला भाजपने तिकीट नाकारले

बेंगळूरु – लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण बेंगळूरु मतदारसंघामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अनंतकुमार यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या ऐवजी तेजस्वी सुर्या नावाच्या नवीन तरुण कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी दिली आहे.

अनंत कुमार हे दक्षिण बेंगळूरुमधून सहा वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांना उमेदवारी मिळणे स्वाभाविकपणे अपेक्षित धरले जात होते. पण काल मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर झालेल्या भाजपच्या यादीमध्ये तेजस्वी सूर्याना उमेदवारी दिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातच दक्षिन बेंगळूरुमध्ये मतदान होणार आहे. तेजस्वी सूर्या हे व्यवसायाने वकिल आणि पक्षाच्या सोशल मिडीया प्रचार टीमचे सदस्य आहेत. सूर्या हे भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीसही आहेत. कर्नाटक भाजपच्या कमिटीनेच तेजस्विनी कुमार यांच्या नावाची शिफारस केली होती. तेजस्विनी यांना उमेदवारी मिळण्याचा आणि विजयी होण्याचा विश्‍वासही वाटत होता. त्यांनी प्रचाराची तयारीही सुरू केली होती. मात्र पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना धक्काच बसला आहे.

दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्यासाठीच तेजस्वी सूर्या यांना संधी दिली गेल्याचे बोलले जात आहे. याशिवाय असामान्य वक्‍तृत्व आणि संघटन कौशल्य यामुळेही त्यांनी पक्षाच्या नेत्यांना प्रभावित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.