भाजपचा सुरक्षित मतदारसंघ

– विदिशा मतदारसंघ

मध्य प्रदेशचा विदिशा लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या सर्वांत सुरक्षित जागांपैकी एक आहे. विदिशाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. पाली साहित्यांमध्ये विदिश प्रातांचे नाव बेसनगर असे आहे जे शुंग साम्राज्याच्या पश्‍चिम प्रांताची राजधानी होती. महान सम्राट अशोक स्वतः विदिशाचा राज्यपाल होता. त्याचा उल्लेख महाकवी कालिदासाने त्याच्या मेघदूत या महाकाव्यात केला आहे. विदिशापासून तीन किलोमीटर अंतरावर उदयगिरीच्या डोंगरांमध्ये अनेक ऐतिहासिक गुंफा आहेत. त्या पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. जैऩ धर्माच्या प्राचीन स्मारकांपैकी एक स्मारक विदिशामधील सिरोनी भागात आहे. तिथे आठवे तीर्थंकर चंद्रनाथ यांची मूर्ती सापडली आहे. गिरधारीजीचे मंदिर, जटाशंकर आणि महामाया मंदिर ह्या तीन जागा पर्यटनाचे महत्त्वाची केंद्रे आहेत.

या लोकसभा मतदारसंघात भोजपूर, सांची, सिलवानी, विदिशा, बसोडा, बुधनी, इच्छावर आणि खातेगाव असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सुरुवातीपासून तिथे जनसंघ आणि भाजपचा प्रभाव आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे क्षेत्र म्हणून विदिशा लोकसभा मतदारसंघाला राजकीय विश्‍वात प्रसिद्धी मिळाली आहे. सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मतदारसंघातून सहाव्यांदा शिवराजसिंह आपले नशीब आजमावत आहेत.

मागील तीन निवडणुकांमध्ये ही जागा सुषमा स्वराज यांच्याकडे होती. गेल्या वर्षी त्यांनी असे सांगितले होते की उमेदवारांची निवड ही पक्षाकडून केली जाते. पण मी आता पुढची निवडणूक न लढवण्याचे मनापासून ठरवले आहे. माझा हा निर्णय पक्षालाही सांगितला आहे. त्यामुळेच येत्या लोकसभेच्या निवडणुकीत विदिशाच्या जागेवरून कोण निवडणूक लढवणार हा औत्सुक्‍याचा विषय झालाय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या जागेवरून 1991 पासून ते 2004 सालापर्यंत पाच वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे पुन्हा शिवराजसिंहच या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. अर्थात शिवराजसिंह चौहान केंद्रात जाऊ इच्छित नाहीत तर आपल्याच प्रदेशात राहून काम करू इच्छितात. सुषमा स्वराज यांच्यासारखा भाजपचा दिग्गज नेता या सुरक्षित जागेवरून निवडणूक लढवणार नसेल तर शिवराजसिंह यांची पत्नी साधना सिंह मैदानात उतरू शकतात.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांदरम्यान मध्य प्रदेशामध्ये भाजपाच मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. पण अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांत तेथे कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. साहजिकच कॉंग्रेससाठी विदिशाची जागा मिळवणे प्रतिष्ठेचे आहे. दोन्ही प्रमुख पक्षांची उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर डावपेचांचे समीकरण तयार होईल.
लोकसभेची ही जागा 1967 मध्ये चौथ्या लोकसभेबरोबर अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या 13 लोकसभा निवडणुकांमध्ये फक्त एकदा जनता पक्ष आणि 2 वेळा इंदिरा कॉंग्रेस यांनी ही जागा जिंकली होती. इतर वेळी या जागेवर जनसंघ आणि भाजपचाच कब्जा राहिला आहे. या जागेवर जनसंघाचा दबदबा किती असावा याचा अंदाज लावता येतो ते 1971 च्या उदाहरणावरून. तेव्हा देशात जेव्हा कॉंग्रेसला इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाले होते. असे असूनही विदिशाच्या मतदारांनी जनसंघाच्या पारड्यातच आपले मतांचे दान टाकले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.