मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतरांसोबत गेलेल्या महाराष्ट्रातील आमदारांच्या गटामध्ये भाजपचे आमदार संजय कुटे हेही आहेत अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चु कडू यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,भाजपचे आमदार संजय कुटे आमच्यासोबत आहेत.
ते शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदार आणि काही अपक्षांची गुवाहाटीमध्ये काळजी घेत आहेत. कुंटे यांनी शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांची सुरतच्या हॉटेलमध्ये भेट घेतली होती त्यानंतर ते आमच्या बरोबर गुवाहाटीलाही आले होते असे कडु म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून, नंतर त्यांची संख्या 46 वर जाईल. शिरसाट हे औरंगाबाद (पश्चिम) मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. येथे (गुवाहाटीत) शिवसेनेचे 35 आमदार आणि पाच अपक्ष आमच्यासोबत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
आमचे समर्थक असलेले काहीं आमदार अजूनही महाराष्ट्रात आहेत. पण त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांची नावे सांगू शकत नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की सेनेचे बंडखोर आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज नाहीत, परंतु त्यांची नाराजी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. असंतुष्ट सेना आमदारांनी बंडखोरी करण्यापूर्वी अडीच वर्षे वाट का पाहिली, असे विचारले असता, शिरसाट यांनी कोविडची साथ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे आम्ही थांबलो होतो असे म्हटले आहे.