भाजपची फिरवलेली भाकरी “कच्ची’ राहू नये म्हणजे झालं!

जयंत कुलकर्णी
नगर – नेहमीच इलेक्शन “मोड’वर राहणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे आणि याच लौकिकाला जागून भाजपने नगर जिल्ह्यातही संघटनात्मक बदल करीत “भाकरी’ फिरवली. नव्याने जिल्हाध्यक्ष देताना दक्षिण नगरला दिलीप भालसिंग, उत्तर नगरमधून विठ्ठलराव लंघे व नगर जिल्हाध्यक्षाची धुरा ऍड. अभय आगरकर यांच्यावर सोपवली. ही रचना व त्यासाठी नेमलेल्या नावांमागे पक्षाची काही गणिते नक्कीच असतील. पण, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही फिरवलेली भाकरी “करपणार’ नसली, तरी ती “कच्ची’ राहू नये, अशी अपेक्षा करू या. मेमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर जिल्हा भाजपत संघटनात्मक बदलाचे वारे सुरू झाले. त्याच महिन्यात अपेक्षित असलेली जिल्हाध्यक्ष निवड दोन महिन्यांनंतर पूर्णत्वास आली आणि गेल्या आठवड्यात जिल्ह्याला नवे जिल्हाध्यक्ष देत प्रदेश भाजपने ही “भाकरी’ फिरवली. ऍडध आगरकर वगळता दक्षिण व उत्तर असे दोन्ही जिल्हाध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मर्जिनुसार जिल्हाध्यक्ष देण्यात आले आहेत.
नवीन जिल्हाध्यक्ष देताना पक्षनेतृत्वाने नेमकी काय गणिते व कोणती समीकरणे विचारात घेतली, याचे परफेक्ट गणित लावणे कठीण असले, तरी त्यासंबंधी अंदाज मात्र बांधता येऊ शकतो. नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे दिलीप भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. भालसिंग हे नगर तालुकाध्यक्ष होते.त्यानंतर जिल्हा सरचिटणीस अशा पद्धतीने ते पुढे आहे. यापुर्वी ते माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड त्यानंतर आमदार प्रा. राम शिंदे यांचे समर्थक झाले. आता जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. आता कर्डिलेंचे समर्थक म्हणजे हे पालकमंत्री विखे यांचे जवळचे झाले आहेत. भालसिंग यांच्यावर दक्षिणेची जबाबदारी टाकण्यात आली. मात्र ते स्वतः किती निर्णयक्षम आहे हे तसेच सांगणे धाडसाचे होईल. त्यामुळे त्यांचा कर्ता आणि करविता दुसरा आहे. ते सांगतील तशीच पूर्व दिशा भालसिंग यांना ठरवावी लागणार आहे.
मनमिळाऊ, विनम्र असा त्यांचा स्वभाव या भागातील त्यांची स्वीकारार्हता वाढवतो.
जिल्हाध्यक्षपदाच्या रचनेत दुसरे नाव उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदासाठी विठ्ठलराव लंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लंघे तसे भाजपचे, पण 2012 मध्ये त्यांनी भाजपच्या जिल्हाधक्षपदाचा त्याग करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे मानस पुत्र म्हणून त्यांची त्यावेळी नवी ओळख झाली.
त्यातून जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांनी भुषविले. भाजपवासी असतांना त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद भुषवून आघाडी सरकारच्या काळात कामे केली. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती ही पक्षाच्या अनेक जुन्या व निष्ठावंतांना खडकणारी असली तरी ते पालकमंत्र्यांचे निकट असल्याने तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दावेदार ठरणार असल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली.विशेष म्हणजे लंघे यांनी भाजपकडून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढली. त्यात ते पराभूत झाले. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. आताही ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली.
नगर शहर जिल्हाध्यक्षपदी ऍड. अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच ते दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष झाले आहे.पक्षाची सीनिअर म्हणून संधी देण्यात आली असली तरी संघटन कौशल्याचा त्यांच्यात अभाव दिसतो. तरीही त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. अशा प्रकारच्या संघटनात्मक पदांवर नियुक्ती करताना पक्षनेतृत्वाचा काहीतरी उद्देश निश्चित असतो. या वेळी तो काय होता, हा प्रश्नच आहे. पक्षाचे निष्ठावंत व माजी नगराध्यक्ष राहिले आहे. 2014 मध्ये जिल्हाध्यक्ष होते. त्यापूर्वी 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी राष्ट्रवादी पुरस्कृत विधानसभेची उमेदवारी केली आहे. 2014 मध्ये जिल्हाध्यक्ष असतांना महापालिका निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव स्वीकारवा लागला. त्यावेळी तिकिट वाटपावरून नते व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. एवढे होऊनही तिकिट वाटपाचा घोळ झालाच.
तरीही नव्या रचनेत तीन जिल्हाध्यक्ष देत भाजपने “भाकरी’ फिरवली आहे, हे निश्चित. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, असे सांगितले जाते, पण ही भाकरी आताच फिरवलीय, ती लगेच करपण्याची शक्यता नाहीच. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर “रिझल्ट’ मिळाले नाहीत, तर ही भाकरी कच्ची’ राहिली, असे म्हणण्याची वेळ नेतृत्वावर येऊ नये.





