जि. प.चे माजी सदस्य चेडे यांनी भरला अर्ज : शिवसेनेला एकटे पाडण्याचा प्रयत्न
पारनेर – पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप बंडखोरी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेने पाठोपाठच भाजप कार्यकर्त्यांनी देखील बंडाळी केली असल्याने तालुक्यात बंडाळीला ऊत आला आहे.
सेना-भाजप युती राज्यात झालेली असताना पारनेरमधून मात्र भाजपच्या काही निवडक कार्यकर्त्यांसह उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, बाळासाहेब नरसाळे यांच्या उपस्थितीत वसंत चेडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता, तालुक्यातील बरेचशे भाजपचे कार्यकर्ते सध्याच्या लोकप्रतिनिधींवर नाराज असल्यामुळे वेगळा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध व्हावा, म्हणून हा प्रयत्न असून, यापुढील काळामध्ये योग्य भूमिका घेतली जाईल, असे देखील सांगण्यात आले.
त्याचबरोबर भाजपच्या तालुकाध्यक्षांनी भाजप तालुक्यातून बंडखोरी करणार नसून, उमेदवारी अर्ज भरणे हे प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे. त्यामुळे चेडे यांनी उमेदवारी अर्ज भरला असेल. परंतु त्यांच्याशी याबाबत चर्चा करून त्यांना माघारीसाठी परावृत्त करू किंवा वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.
चेडे यांनी उमेदवारी अर्ज भरते वेळेस भाजपचे काही ठराविक कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत असल्याने भाजपचा नाराज गट हा बंडखोरी करणार असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते हे युती धर्म पाळतात का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. चेडे उमेदवारी अर्ज मागे घेतात का निवडणूक लढतात, यावरच तालुक्यातील भाजप बंडखोरी करेल किंवा नाही हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे माघारीपर्यंत तरी चित्र स्पष्ट होणार नाही.