नगर: लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी आता “यु टर्न’ घेतला आहे. पक्षाचा आणि खासदार दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि. 4) सुवेंद्र गांधी यांनी निवडक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही घोषणा केली. संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासह नगर शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाने खासदार दिलीप गांधी यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खासदार गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी करणार नसून, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराचे काम सर्वांना करायचे आहे, अशा शब्दांत सुवेंद्र गांधी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, सुवेंद्र गांधी यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या अडचणी दूर झाल्याचे चित्र आहे.