विधानसभेच्या अनुषंगाने नवी आखणी; कराड दक्षिण-उत्तरमध्ये राबविणार उपक्रम
कराड – भाजपाच्या वतीने नारी शक्ती सन्मान महोत्सवांतर्गत रक्षाबंधन पर्वाचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. त्याचा कराड येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत भाजपाच्या वतीने सर्व महिलांकडून भारतीय जवान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या देण्याचे आवाहन करण्यात येणार असून त्यांना ओवाळणी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र देण्यात येणार आहे. त्यावर महिलांनी आपला अभिप्राय लिहायचा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने आणखी एक नव्या उपक्रमाची आखणी केल्याचे यावरून स्पष्ट होते.
हे अभियान दि. 1 ऑगस्ट ते दि. 12 ऑगस्ट अखेर चालणार आहे. महिला आघाडीच्या सदस्या या उपक्रमाच्या अनुषंगाने कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक घर पिंजून काढणार आहेत. शासनाने महिलांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना म्हणजे उज्वला गॅस योजना, आवास योजना, मातृवंदना भोजन योजना, अस्मिता योजना आदींची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे. तसेच रक्षाबंधन निमित्ताने आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व भारतीय जवांनांना राखी देण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राखी देणाऱ्या प्रत्येक महिलेला मुख्यमंत्री यांचे पत्र ओवाळणी म्हणून देण्यात येणार आहे.
सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाची आखणी केल्याची चर्चा परिसरातून होत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्य वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपा कराड शहर महिला आघाडीच्यावतीनेही कराड दक्षिण व उत्तर मतदार संघात हा उपकम राबविला जाणार असून त्याचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कराड नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, नगरसेविका अंजली कुंभार, नगरसेवक सुहास जगताप, महिला आघाडी अध्यक्षा माधुरी काळे, साधना कर्णिक, प्रमोद शिंदे, नथुराम कुंभार यांचेसह मान्यवर उपस्थित होते.