नवी दिल्ली – कोणत्याही महिलेने तक्रार केली असेल तर त्याची तातडीने दखल घेतली गेली पाहिजे आणि जर महिला पैलवानांची गोष्ट असेल तर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या बीड येथील खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे.
प्रितम मुंडे या भाजपचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांनीच हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे.
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनीया आदी पैलवानांनी कुस्ती महासंघाचे ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांना अन्य पैलवानांची साथ मिळाली आहे. आता मुंडे यांच्या रूपाने भाजपची महिला खासदारही त्यांच्या पाठिंब्यासाठी पुढे आली आहे.
विशेष म्हणजे आंदोलन पैलवानांच्या थेट बाजूने वक्तव्य करणाऱ्या प्रीतम मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या खासदार ठरल्या आहेत. त्या म्हणाल्या, महिला पैलवानांच्या मागणीवर ताबडतोब विचार झाला पाहिजे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गंभीर तपासाच्य दृष्टीने पाउले उचलली पाहिजेत.
ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की मी मानते की पूर्ण तपास झाल्यावरच कोणतीही कारवाई झाली पाहिजे. मात्र येथे ही बाबही ध्यानात घेतली पाहिजे की तक्रारींकडे दुर्लक्ष होता कामा नये. जर काही महिला गंभीर विषय उपस्थित करत असतील तर त्यावर त्वरित विचार केला गेला पाहिजे.