भाजपकडून बेरजेचे राजकारण

बिनविरोध : उपाध्यक्षपदाची माळ अपक्ष रघुवीर शेलार यांच्या गळ्यात
देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या पदाधिकारी निवडीला विधानसभेचा रंग 

देहूरोड – विधानसभा निवडणुकीत एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून भारतीय जनता पक्षाने बेरजेचे राजकारण केले आहे. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीत अनपेक्षित चेहरा समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बोर्डाच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक एकमधील अपक्ष म्हणून निवडून आलेल्या रघुवीर शेलार यांना उपाध्यक्षपदाची संधी दिली. त्यामुळे या निवडीला विधानसभेचा रंग असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत उपाध्यक्षपदी रघुवीर शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर संजय खन्ना यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ब्रिगेडियर खन्ना यांच्या अध्यक्षतेत विशेष बैठक पार पडली. देहुरोड बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल हे सुट्टीवर असल्याने प्रभारी म्हणून खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह, मावळत्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, ऍड. अरुणा पिंजण, बोर्डाचे पदाधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

विशेष बैठकीत उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे यांनी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर खन्ना यांच्याकडे सुपूर्द केलेला उपाध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांनतर उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.सदस्य शेलार यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. या अर्जाला सदस्य ऍड. अरुणा पिंजण हे सूचक, तर सदस्य विशाल खंडेलवाल यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज आल्याने त्यानंतर अध्यक्ष खन्ना कोणाचाही विरोध नसल्याने त्यांनी शेलार यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

बोर्डाच्या वतीने अध्यक्ष खन्ना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बोर्डाच्या सभेनंतर नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू आणि गोपाळराव तंतरपाळे यांनी “सीईओ’च्या कार्यालयात अध्यक्ष ब्रिगेडियर खन्ना व सीईओ सिंह यांच्याशी बोर्डाच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर बांधकाम (अतिक्रमण) करून राहणाऱ्या मतदारांची नावे समाविष्ट करण्याच्या विषयावर वनविभाग, लष्करी आणि बोर्डाचे जमीन, नकाशा, सीमाहद्द, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया या संदर्भात बराच वेळ चर्चा केली.

शेलार यांचा पुनर्वसन, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सत्कार केला. या वेळी नगरसेवक सुरेश भोईर, गुलाब म्हाळस्कर, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, शांताराम कदम, प्रशांत ढोरे, संदीप काकडे, भास्कर ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष ऍड. कैलास पानसरे, नगरसेवक खंडेलवाल आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.