Jammu and Kashmir election 2024 – जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही आघाडी केल्याने भाजपची धास्ती वाढली आहे. त्यातून तो पक्ष आघाडीचे नकारात्मक चित्र रंगवण्याचा प्रयत्न करत आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या मित्रपक्षांनी सोडले.
कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला सत्ता मिळाल्यास जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि भ्रष्टाचाराचे सत्र सुरू होईल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. त्यावरून कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने पलटवार केला. केंद्रात १० वर्षांपासून सत्तेत असूनही भाजपने जम्मू-काश्मीरसाठी काहीच लक्षणीय केले नाही. त्या सरकारने राज्यघटनेचे कलम ३७० हटवले.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. जम्मू-काश्मीरचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले. त्या घडामोडी म्हणजे जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या प्रतिष्ठेवरील थेट हल्ला आहे. शहा यांनी वारंवार दहशतवादाच्या उच्चाटनाची आश्वासने दिली. प्रत्यक्षात वास्तव वेगळेच आहे. काश्मीरमधील दहशतवाद कायम आहे. उलट, जम्मूतही तो फोफावू लागला आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते रत्तनलाल गुप्ता यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले.
कॉंग्रेसचे नेते रमन भल्ला यांनीही इतरत्र बोलताना भाजपवर निशाणा साधला. भाजपकडे सांगण्यासारखे काही नसल्याने तो पक्ष मतदारांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करू पाहत आहे. पण, त्याचा काही उपयोग होणार नाही. आमची आघाडी म्हणजे केवळ कुठली राजकीय व्यवस्था नाही. आशा, ऐक्य, प्रगतीचे प्रतिनिधित्व करणारी आघाडी म्हणजे जनतेची चळवळ आहे, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने घोषणापत्र (जाहीरनामा) जारी केले. त्याची खिल्ली कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने उडवली. भाजपचे घोषणापत्र म्हणजे निव्वळ जुमलापत्र आहे. त्या पक्षाकडून खोटी आश्वासने दिली जातात. त्यामागे मतदारांची दिशाभूल करण्याचा उद्देश असतो, असे त्या पक्षांनी म्हटले.