कोळगाव – श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे दिनकर पंदरकर यांच्या पॅनलच्या सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांची बिनविरोध निवड झाली. पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी असलेल्या माजी आमदार राहुल जगताप यांच्या पॅनलच्या सुमन मोरे यांचे पद अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने रद्द करण्यात आले होते. रिक्त असलेल्या जागेसाठी 29 मे रोजी सरपंच निवडीबाबत सभा घेण्यात आली.
सरपंचपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असल्याने माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर यांच्या पॅनलतर्फे सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. दुपारी 2 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच निवडीकरिता विशेष सभा बोलावली होती. मात्र गणपूर्ती अभावी सभा तहकूब करण्यात आली. सभा तहकूब झाल्याची नोटीस नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करून आज दुपारी 2 वाजता सभा घेण्यात आली.
या सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता नसल्याने पंदरकर गटाचे 6 सदस्य हजर होते. तर जगताप गटाचे 11 सदस्य गैरहजर असल्याने सरपंचपदी सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नवनिर्वाचित सरपंच सुलक्षणा पाडळे यांचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सत्कार करून पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ताराबाई पंदरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर, भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, पंदरकर गटाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.