उत्तरप्रदेशसाठी भाजपची नवी रणनीती; योगींसह प्रमुख नेते लढवणार विधानसभा निवडणूक

लखनौ  – उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रमुख नेत्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.

योगी यांच्याबरोबरच केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा हे दोन्ही उपमुख्यमंत्री विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्यासह भाजपने प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सांगितल्याचे समजते.

प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत पक्षाच्या बाजूने वातावरणनिर्मिती होईल. आसपासच्या मतदारसंघांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल, असे भाजपला वाटत आहे. प्रभावी उमेदवारांमुळे विरोधी पक्षांवर दबाव येईल.

तसेच, बड्या नेत्यांना मागील दाराने आमदार बनवल्याचा आरोपही होऊ शकणार नाही, असा भाजपचा विचारही त्यामागे आहे. राजकीयदृष्ट्या उत्तरप्रदेश हे देशातील सर्वांत महत्वाचे राज्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुठली कसर राहणार नाही याची दक्षता भाजपकडून घेतली जात आहे.

उत्तरप्रदेशची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्तारूढ भाजपबरोबरच विरोधी पक्षांच्या गोटातील हालचालीही वाढल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.