नवी दिल्ली – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका साधारण वर्षभराच्या कालावधीत होणार असल्याने सत्ताधारी भाजपाने आत्तापासूनच योजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच दृष्टिकोनातून देशातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या डोक्यातून आता मोदी मित्र ही संकल्पना समोर आली आहे. देशभरातील 65 मुस्लिमबहुल मतदार संघामध्ये ही मोदी मित्र संकल्पना राबवण्यात येणार आहे.
या योजनेचा शुभारंभ 25 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना भाजपबरोबर आणण्याचे काम केले जाणार आहे. गेल्याच आठवड्यात सुफी संवाद यात्रेच्या निमित्ताने मुस्लिम मतदारांना जोडण्याचा एक प्रयत्न केला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता ही मोदी मित्र योजना राबवण्यात येणार आहे.
जे 65 मुस्लिम बहुल मतदार संघ निवडले आहेत. ते पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम, केरळ आणि बिहार या राज्यांमधील आहेत. यापैकी प्रत्येकी 13 मतदारसंघ फक्त उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आहेत. या योजनेप्रमाणे पहिल्यांदा जिल्हास्तरावर मोदी मित्र नेमले जाणार असून नंतर प्रत्येक जिल्ह्यातील ब्लॉक स्तरावरही मोदी मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे.
हे मोदी मित्र मुस्लिम समाजाला भाजप सोबत जोडण्याचे काम करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत केलेले काम विविध योजना आणि त्यांचे अंमलबजावणी याची संपूर्ण माहिती मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम मोदी मित्र करणार आहेत. काही वर्षांमध्ये झालेल्या अभ्यासाप्रमाणे मुस्लिम मतदारांमध्ये सुद्धा मोदी यांच्याबाबत आकर्षण वाढत चालले आहे. त्या आकर्षणाचाच फायदा घेण्यासाठी आता या विविध योजना राबवण्यात येत आहेत.
सुफी संवाद यात्रा असो किंवा मुस्लिम समाजाच्या विविध सणांमध्ये सहभाग घेण्याचे कार्यक्रम असो किंवा मोदी मित्र योजना असो सर्व प्रकारे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आता भाजपने योजना आखली आहे. मोदी मित्र योजनेप्रमाणे जिल्हास्तरावर आणि ब्लॉक स्तरावर जे मोदी मित्र नियुक्त केले जाणार आहेत, त्यांना प्रत्येकी फक्त 10 मुस्लिम मतदार आपल्याकडे आणण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे.