अयोध्या – आगामी काळात उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यासोबतच गोवा, मणिपूर, उत्तराखंड या भाजपाशासित चार राज्यांमध्ये आणि पंजाब या कॉंग्रेस शासित राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
उत्तर प्रदेशचे महत्त्व लक्षात घेता भाजपाने या राज्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. उत्तर प्रदेशात दसऱ्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृह अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार आहेत.
उत्तर प्रदेशची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यात भाजपाविरोधी पक्षांची देशभरात एकजूट करण्याचे प्रयत्न होत असताना उत्तर प्रदेशसारखं राज्य आपल्या ताब्यात असावे, यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी दसऱ्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात 30 हून जास्त सभा घेणार आहेत. त्यामध्ये 14 सप्टेंबरला अलिगढ आणि 26 सप्टेंबरला लखनौमध्ये मोदी सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांच्या देखील 50 हून जास्त सभा होणार असल्याचे वृत्त आहे.