ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी
कोलकाता – लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशानंतर आता भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यासाठी भाजपचे आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महत्त्वाची रणनीती आखत आहे. एक म्हणजे सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या जनाधार असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात सामील करुन घेत आहे. तर दुसरे म्हणजे खालच्या पातळीवर आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी 294 जागा आहेत. त्यामुळे भाजपने “मिशन 250’चे लक्ष्य निर्धारित केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने तृणमूल कॉंग्रेसला चांगलीच टक्कर देत 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला फक्त 22 जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जास्त महत्व देत नाही. तृणमूल कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला 40.5 टक्के मतदान झाले आहे. तर राज्यात विधानसभेच्या सहा जागा भाजपाच्या आहेत.