पश्‍चिम महाराष्ट्रासाठी भाजपचा मास्टर प्लॅन

सातारा व सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष
संदीप राक्षे

सातारा – पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकांची तातडीने जुळवाजुळव सुरू केली आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यावर राजकीय पकड बनवण्याचे मजबूत मनसुबे रचलेल्या भाजपच्या हायकमांडने विधानसभेच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील 58 पैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे.

युतीने 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीला तगडी टक्कर देत पश्‍चिम महाराष्ट्रात 33 जागा जिंकल्या होत्या. पुणे जिल्ह्यात मनसेचे आमदार शरद सोनवणे लोकसभा निवडणुकीपूर्वी सेनेत गेले त्यामुळे युतीचे सध्या 34 आमदार आहेत. रासपकडून निवडून आलेल्या राहुल कुल यांचाही त्यात समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे (17 जागा) कोल्हापूर ( 8 पैकी 6 जागा – शिवसेना 2 भाजप) सांगली (एकूण 5 जागा – 4 भाजप 1 शिवसेना) अशा बत्तीस अधिक कुल व सोनावणे यांची बेरीज केली तर 34 आमदारांनी युतीचा गाडा पाच वर्ष पश्‍चिम महाराष्ट्रात हाकला. आता मिशन विधान राभा 2019 करिता सातारा व सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र रणनीती भाजप हायकमांडने आखली असून वाढीव दहा जागांचे लक्ष्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सोपवण्यात आले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकार व साखरपट्टा त्यात शरद पवारांच्या विचारांनी चालणारा जिल्हा, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, ऐतिहासिक मराठा साम्राज्याची राजधानी अशी बहुपेडी ओळख सातारा जिल्ह्याची आहे. तब्बल दोन दशके राष्ट्रवादी येथे कॉंग्रेसला मागे ढकलत पक्की मांड ठोकून आहे. सातारा लोकसभा मतदार संघाच्या लगत असणारा माढा लोकसभा मतदारसंघ भाजपने संजय मामांचा मामा करत खिशात घातला. त्यामुळे साताऱ्यात वाई, दक्षिण कराड, माण-खटाव, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, सोलापूर मध्य, पंढरपूर, सांगोला अशा एकूण नऊ विधानसभा मतदार संघावर भाजपने आपले लक्ष्य केंद्रित केले आहे.

भाजपला साताऱ्यात अद्याप खाते उघडता आलेले नाही. कराड उत्तर व दक्षिणसह माण-खटाव व कोरेगाव या चार विधानसभा मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीसमोर तगडे पर्याय उभे करून त्यांना ताकत द्यायचे सर्वाधिकार चंद्रकांत दादांवर सोपवण्यात आले आहेत. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हा विधानसभा मतदारसंघ व स्व. आर. आर. पाटील यांचा तासगाव कवठेमहांकाळ हा मतदारसंघ भाजपच्या रडारवर आहे. त्यामुळे कोल्हापूर ते कराड या पट्ट्यात राजकीय तळ दिलेल्या चंद्रकांत दादांची राजकीय गणिते पुन्हा सुरू झाली आहेत. सातारा व फलटणं ही महत्वाची ठाणी काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष रसद पुरविली जाणार असल्याचे विश्‍वसनीय संकेत आहेत. तासगावमध्ये अजित घोरपडे यांना ताकत दिली जात असताना कॉंग्रेसचे युवा नेते विश्‍वजित कदम यांनाही चुचकारण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी सोडलेले नाहीत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×